IPL 2021 चा हंगाम अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच टीम जोरदार तयारीला लागल्या आहेत. धोनी ब्रिगेड अर्थात CSK नं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये आलेलं अपयश पुसून टाकण्याचा निर्धार केला आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज यंदा प्लेऑफच्या आधीच आयपीएलमधून बहेर पडली, तरी फारसं आश्चर्य वाटणार नाही, असं भाकित भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी वर्तवलं आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० एप्रिल रोजी धोनी ब्रिगेडची गाठ नव्यानंच कर्णधारपदाची धुरा हाती आलेल्या रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी पडणार आहे.
बरेच खेळाडू क्रिकेटपासून दूर!
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश चोप्रा यांनी सीएसकेच्या आयपीएल हंगामाविषयी दावा केला आहे. “चेन्नई सुपर किंग्ज ही मला एक मिड-टेबल टीम वाटते. त्यांच्या टीममधले अनेक खेळाडू बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायडू हे खेळाडू आधीच क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. शिवाय, दीपक चहर, ड्वेन ब्राव्होसारखे टीममधले अनेक खेळाडू बराच काळ क्रिकेट खेळलेले नाहीत”, असं आकाश चोप्रा म्हणाले आहेत.
मुंबईत अतिजलद गोलंदाज हवेत!
“चेन्नई सुपर किंग्जला लिलावामध्ये पूर्णपणे नव्याने टीम बांधण्याची गरज होती. पण ते शक्य झालेलं नाही. त्यांचे पहिले पाच सामने मुंबईत तर बाकीचे ४ सामने दिल्लीला आहेत. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर त्यांना वेगाने धावा कराव्या लागतील. त्यासोबत त्यांना अतिजलद गोलंदाजांची आवश्यकता भासेल. पण असे गोलंदाज चेन्नईकडे नाहीत”, असं देखील आकाश चोप्रा म्हणाले.
IPL 2021: धोनीसोबतच्या फोटोवर सुरेश रैनाने केली ‘हृदयस्पर्शी’ कमेंट, चाहते झाले फिदा!
१८० धावा करणंही चेन्नईसाठी कठीण?
“जलद गोलंदाजीचा विचार करता चेन्नईकडे शार्दूल ठाकूर, दीपक चहर, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्हो आहेत. जोस हेझलवून हा एकमेव खराखुरा जलदगती गोलंदाज चेन्नईकडे आहे. शिवाय, चेन्नईकडे वेगाने धावा करणारी फलंदाजीही नाही. त्यामुळे १८० धावा करणंही चेन्नईला कठीण जाईल”, असं भाकित आकाश चोप्रा यांनी वर्तवलं आहे. दरम्यान, जेस हेझलवूडनं नुकतीच आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे चेन्नईसमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. हेझलवूडच्या ऐवजी चेन्नईला दुसरा खेळाडू घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
आयपीएलमध्ये कामगिरीमध्ये सर्वाधिक सातत्य असणारी टीम म्हणून CSK कडे पाहिलं जातं. आत्तापर्यंत त्यांनी खेळलेल्या ११ सीजनपैकी १० सीजनमध्ये ते प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. चेन्नईनं आत्तापर्यंत ३ वेळा आयपीएल खिताब जिंकला आहे. पण गेल्या वर्षीचा सीजन फारसा चांगला राहिला नसल्याने आपल्या कामगिरीला साजेसा खेळ करण्याचं आव्हान यंदा धोनी ब्रिगेडसमोर असेल!
IPL 2021 : धोनीच्या CSK ला मोठा धक्का, आयपीएलमधून तिसऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतली माघार