ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या नवीन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. विराट कोहलीकडून शिकवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मॅक्सवेलने म्हटलं आहे. स्टार खेळाडूंच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणारा विराट कोहली दबावातही उत्तम खेलत असून उत्तम कर्णधार असल्याचं कौतुक मॅक्सवेलने केलं आहे. आरसीबीने १४ कोटी २५ लाखांची बोली लावत ग्लेन मॅक्सवेलला विकत घेतलं आहे. गेल्या हंगामात पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलने १३ सामन्यांमध्ये फक्त १०६ धावा केल्या होत्या.

एका मुलाखतीत बोलताना, आपल्यासाठी आदर्श असणारा एबी डेव्हिलिअर्स आणि विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्यासाठी आपण वाट पाहत असल्याचं मॅक्सवेलने म्हटलं आहे. मॅक्सवेल संघात आल्याने आरसीबी संघाची बाजू भक्कम झाली असून नेहमीच विराट कोहली आणि डेव्हिलिअर्सवर केंद्रीत असणारं लक्ष आणि दबाव आता मॅक्सवेलमुळे कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“जर आरसीबी पुढचा टप्पा गाठत असेल तर त्यामागे विराट कोहलीचा मोठा हात आहे. कसोटीपासून ते टी-२० पर्यंत सर्व प्रकारच्या खेळामध्ये विराट कोहलीने सर्वोच्च कामगिरी केली आहे,” असं मॅक्सवेलने म्हटलं आहे.

“विराट कोहलीने खेळ चांगल्या पद्धतीने आत्मसात केला आहे. बऱ्याच वेळासाठी त्याने खेळावर वर्चस्व गाजवलं आहे. मी त्याच्यासोबत खेळण्यासाठी, ट्रेनिंगसाटी उत्सुक आहे. त्याच्याकडून मला काही नेतृत्वगुण शिकण्यास मिळतील अशी अपेक्षा आहे. त्याच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न असेल,” असं मॅक्सवेलने म्हटलं आहे.

विराट आणि आपल्यातील मैत्रीबद्दल बोलताना मॅक्सवेलने क्रिकेटमध्ये मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे या आपल्या वक्तव्याला विराट कोहलीने पाठिंबा दिल्याची आठवण सांगितली. २०१९ मध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. विराटने त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं होतं. हा निर्णय जगभरातील क्रिकेटर्ससाठी आदर्श असेल असा विश्वास विराटने व्यक्त केला होता.