आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या सहाव्या सामन्यामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसल्या. एकीकडे बाद झाल्यानंतर RCB चा कर्णधार विराट कोहलीनं संतापात खुर्ची उडवल्यानंतर थेट मॅच रेफ्रींनीच त्याला समज दिली, तर दुसरीकडे SRH चा कर्णधार डेविड वॉर्नर पंचांच्या निर्णयावर भडकला, पण त्यांच्याच संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी डेविडला खरा नियम काय आहे, हे समजावून सांगितलं. त्यामुळे या सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या कर्णाधारांना समज मिळाल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं सनरायजर्स हैदराबादच्या खिशातला सामना खेचून काढला आणि अवघ्या ६ धावांनी हैदराबादला पराभव पत्करावा लागला.

नेमकं झालं काय?

मॅचच्या १८व्या षटकामध्ये रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीनं चेंडू हर्षस पटेलच्या हाती दिला. समोर हैदराबादचा फलंदाज जेसन होल्डर बॅटिंग करत होता. या ओव्हरमध्ये हर्षल पटेलनं जेसन होल्डरला कंबरेच्या वर फुल्लटॉस टाकला. तो साहजिकच नो बॉल ठरला. पण त्यानंतर पुन्हा विसाव्या षटकामध्ये हर्षल पटेलनं राशिद खानला कमरेच्या वर फुल्लटॉस नो बॉल टाकला. यानंतर देखील अंपायर्सनी हर्षल पटेलला ती ओव्हर पूर्ण करू दिली. यावर कर्णधार डेविड वॉर्नर चांगलाच भडकला. अंपायर्सनी हर्षल पटेलला बॉलिंग करण्यावर बंदी घालायला हवी होती, असं डेविड वॉर्नरचं मत होतं.

नियम काय सांगतो?

IPL 2021 च्या नियमानुसार जर एखाद्या गोलंदाजानं एखाद्या सामन्यात कमरेच्या वर दोनदा फुल्लटॉस टाकले, तर त्याच्यावर त्या सामन्यासाठी गोलंदाजीवर बंदी घातली जाते. त्यासाठी हे फुलटॉस त्यानं फलंदाजाच्या शरीराच्या दिशेनं टाकलेले असावेत असा नियम आहे. त्यामुळे डेविड वॉर्नरने हर्षल पटेलवर अंपायर्सनी बंदी का घातली नाही, असा आक्षेप घेतला होता.

IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?

SRH च्या प्रशिक्षकांनी दिलं स्पष्टीकरण!

दरम्यान, डेविड वॉर्नर जरी भडकला असला, तरी मॅच संपल्यानंतर हैजराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे. “आम्ही फार चांगलं क्रिकेट खेळत नव्हतो. आम्ही सामनाही हरलो. त्यामुळे डेविड वॉर्नर वैतागला होता. मला वाटतं की अंपायर्सनी योग्य निर्णय घेतला. २०व्या षटकात हर्षलनं टाकलेला नो बॉल नक्कीच आक्षेप घेण्यासारखा होता. पण १८व्या ओव्हरमध्ये त्यानं टाकलेला फुल्लटॉस नो बॉल हा काही जेसन होल्डरच्या शरीराच्या दिशेने टाकला नव्हता. त्यामुळे त्यावर आक्षेप घेता येणार नाही. त्यामुळे अंपायरचं बरोबर होतं”, असं बेलिस यांनी सांगितलं आहे.

या सामन्यामध्ये आरसीबीनं हैदराबादसमोर विजयासाठी १५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मनीष पांडे आणि डेविड वॉर्नरनं दुसऱ्या विकेटसाठी तब्बल ८३ धावांची भागीदारी रचत विजयाच्या दिशेने कूच केलं होतं. पण वॉर्नर बाद झाल्यानंतर लागलीच मनीष पांडे देखील बाद झाला. १७व्या ओव्हरमध्ये सनरायझर्सनं एकापाठोपाठ ३ फलंदाज गमावले. त्यामुळे सामना देखील त्यांना गमवावा लागला.