आयपीएल २०२१ च्या स्पर्धेत मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तीन सामन्यात सलग पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानं सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. गुणतालिकेतील सरासरीमुळे कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. मुंबईने आयपीएलमध्ये आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात विजय, तर ६ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेत आता ४ सामने उरले आहेत. पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध सामना खेळणं बाकी आहे. यात दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये गेला आहे. तर हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
आयपीएल गुणतालिकेत १६ गुणांसह महेंद्रसिंह धोनीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या, विराट कोहलीचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या, कोलकात्याचा संघ ८ गुणांसह चौथ्या, पंजाबचा संघ ८ गुणांसह पाचव्या, राजस्थानचा संघ ८ गुणांसह सहाव्या, तर मुंबईचा संघ उणे ०.५५१ नेट रनरेट आणि ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर आठव्या स्थानावर असलेल्या हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पुढचा मार्ग खडतर असला तरी जोमाने तयारी करावी लागेल असं सांगितलं. “आम्हाला स्पर्धेत परतण्याचा मार्ग शोधणं गरजेचं आहे. आम्ही मागेही असं केलं आहे. पण आतापर्यंत या हंगामात तसं घडत नाही”, असं मत रोहित शर्माने व्यक्त केलं.
मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पाच किताब आपल्या नावावर केले आहेत. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब जिंकला आहे.
मुंबईचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसेन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, क्विटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंह