सौरभ तिवारी आणि हार्दिक पंड्या यांनी दिलेल्या बहुमुल्य योगदानामुळे मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर ६ गड्यांनी विजय मिळवला आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल २०२१चा ४२ वा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजी करताना पंजाबला २० षटकात ६ बाद १३४ धावांवर रोखले. एडन मार्कराम आणि दीपक हुडा यांनी दिलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर पंजाबला दीडशे धावांच्या जवळ पोहोचता आले. प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात खराब झाली. मात्र सौरभ तिवारीच्या ४५ धावा आणि शेवटी नाबाद राहिलेल्या हार्दिक पंड्याने ४० धावांची खेळी करत मुंबईला हा विजय मिळवून दिला. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या पोलार्डला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह मुंबईने १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
मुंबईचा डाव
मुंबईप्रमाणे पंजाबनेही आपला फिरकी गोलंदाज एडन मार्करामला डावाचे पहिले षटकत दिले. मुंबईसाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली. चौथ्या षटकात पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने मुंबईला लागोपाठ दोन धक्के दिले. त्याने आधी रोहितला मनदीपकरवी झेलबाद केले त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमारची दांडी गुल केली. रोहितने ८ धावा केल्या, तर सूर्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सौरभ तिवारी आणि क्विंटन डी कॉक यांनी पॉवरप्ले संपेपर्यंत २ बाद ३० धावा फलकावर लावल्या. नवव्या षटकात या दोघांनी मुंबईचे अर्धशतक पूर्ण केले. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने डी कॉकचा त्रिफळा उडवला. डी कॉकने २७ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याला हरप्रीत ब्रारने जीवदान दिले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टाकत असलेल्या १४व्या षटकात हरप्रीतने हार्दिकचा झेल सोडला. सौरभ अर्धशतकाजवळ पोहोचला असताना एलिसने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. सौरभने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावांची मोलाची खेळी केली. पुढच्या षटकात हार्दिकने शमीला चौकार खेचत संघाचे शतक फलकावर लावले. मोहम्मद शमीने टाकलेल्या १९व्या षटकात हार्दिकने १६ धावा कुटत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिकने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या, तर पोलार्ड १५ धावांवर नाबाद राहिला.
पंजाबचा डाव
पंजाबकडून केएल राहुल आणि मनदीप सिंगने सलामी दिली, तर कृणाल पंड्याने मुंबईसाठी पहिले षटक टाकले. मनदीप आणि राहुलने संयमी सुरुवात केली. पहिल्या ५ षटकात पंजाबने बिनबाद ३५ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कृणाल पंड्याने मनदीपला पायचित पकडले. मनदीपने १५ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पंजाबला १ बाद ३८ धावा करता आल्या. मनदीपनंतर ख्रिस गेल मैदानात आला आहे. सातव्या षटकात रोहितने कायरन पोलार्डच्या हाती चेंडू दिला. त्यानेही आधी केएल राहुल (२१) आणि ख्रिस गेलला (१) बाद करत रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. पुढच्याच षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पंजाबचा नवा फलंदाज निकोलस पूरनला पायचीत पकडले. ५० धावांच्या आत पंजाबने चार फलंदाज गमावले. त्यानंतर एडन मार्कराम आणि दीपक हुडा यांनी संघासाठी धावा जमवल्या. १२ षटकात त्यांनी पंजाबला ४ बाद ७५ अशी धावसंख्या गाठून दिली. १५व्या षटकात मार्करामने बोल्टला चौकार खेचत हुडासोबत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. याच षटकात पंजाबने शतक पूर्ण केले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बोल्टने हुडाला जीवदान दिले. पण १६व्या षटकात फिरकीपटू राहुल चहरने मार्करामला क्लीन बोल्ड करत पंजाबला पाचवा धक्का दिला. मार्करामने ६ चौकारांह ४२ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. १९व्या षटकात बुमराहने हुडाला झेलबाद केले. पंजाबने २० षटकात ६ बाद १३४ धावा केल्या.
हेही वाचा – इंझमामला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सचिननं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तू नेहमीच..”
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
पंजाब किंग्ज – केएल राहुल (कर्णधार-यष्टीरक्षक), मनदीप सिंग, ख्रिस गेल, निकोलस पूरन, एडन मार्कराम, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि रवी बिेश्नोई.