दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्यापही यंदाच्या हंगामात बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे लागणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा आहे. मात्र आज सनरायझर्स हैदराबादविरुद्द होणाऱ्या सामन्यामध्ये त्यांना चमत्कार वाटावा अशी कामगिरी करण्याबरोबरच नशिबाची साथही फार गरजेची आहे. ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे लागणार असलं तरी सामन्याच्या निकालाआधीच नाणेफेकीचा निकाल मुंबईला सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाता येईल की नाही हे निश्चित करणार आहे. म्हणजेच अगदी साध्या भाषेत सांगायचं तर केवळ नाणेफेकीच्या आधारेच मुंबईचे प्लेऑफचे दरवाजे बंद होणार की सामना थाटात जिंकून मुंबई प्लेऑफमध्ये प्रवेश करणार हे निश्चित होणार आहे. हे नक्की काय प्रकरण आहे आणि आता मुंबईला प्लेऑफमध्ये पात्र ठरवण्यासाठी काय गरजेचं आहे ते पाहूयात…
गतविजेत्या मुंबईने मागील लढतीत राजस्थान रॉयल्सवर तब्बल ७० चेंडू राखून विजय मिळवल्याने त्यांची निव्वळ धावगती झपाट्याने वाढली. मात्र तरीही १३ सामन्यांत १२ गुण कमावणाऱ्या मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. त्यातच काल कोलकात्याने निर्णयाक सामन्यामध्या राजस्थानचा धुव्वा उडवत शानदार विजयासहीत अंतिम चार संघांमध्ये आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. कोलकाता राजस्थान सामना एकतर्फी झाल्याने मुंबईला आता नशिबाच्या भरोश्यावर रहावं लागणार आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माने नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच नशीब मुंबईच्या बाजूने असण्याची गरज आहे. कसं ते समजून घेऊयात.
कोलकात्याने राजस्थानला पराभूत केल्याने राजस्थानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थानबरोबरच सनराईजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचंही स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. कोलकात्याने आपल्या १४ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईचा एक सामना बाकी असून त्यांनी जो जिंकला तर त्यांचे सुद्धा १४ सामन्यांमध्ये ७ विजय होतील. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत कोलकाता सध्या +०.५८७ वर आहे तर मुंबई +०.०४८ वर आहे. त्यामुळे मुंबईने सामन्य पद्धतीने सामना जिंकला तरी ते जास्तीत जास्त पंजाबच्या वर सरकतील आणि त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. कारण नेटरन रेटच्या जोरावर मुंबई अव्वल चार संघांमध्ये जाणार नाही.
आता असं असलं तरी मुंबईला एक अगदीच धूसर संधी उपलब्ध आहे. पण त्यामध्येही नशिबाचा फार मोठा वाटा आज मुंबईसोबत असणं आवश्यक आहे. म्हणजे आज मुंबईला गुणतालिकेमध्ये मागे टाकायचं असेल तर पराक्रम करावा लागणार असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नेट रनरेटमधील तफावत भरुन काढण्यासाठी मुंबईला प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. इतकच नाही तर त्यानंतर त्यांना धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाला तब्बल १७१ धावांनी पराभूत करावं लागणार आहे. म्हणजे हे जवळजवळ अशक्य आहे.
इतकच नाही तर नशिबाचा सर्वात महत्वाचा फॅक्टर या नेट रनरेटच्या गणितामध्ये मुंबईसोबत असणं गरजेचं आहे, तो म्हणजे टॉस. मुंबईला आज सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच करावी लागणार आहे. जर त्यांनी नाणेफेक जिंकली नाही आणि त्यांना प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागलं तर धावांचा पाठलाग करुन त्यांना रनरेट सुधारता येणार नाही. सामना कितीही विकेट्स राखून जिंकला तरी त्याचा नेट रनरेटवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग करुन सामना हाती लागला तरी प्लेऑफच्या बसचं तिकीट मात्र मुंबईला मिळणार नाही. म्हणूनच नाणेफेक जिंकून अडीचशे तीनशे स्कोअर करा. टिच्चून गोलंदाजी करत मागील सामन्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला १०० धावसंख्येच्या आत गुंडाळा हा एकच पर्याय मुंबईकडे आहे.
कर्णधार रोहित शर्मा (३६३ धावा), इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या आघाडीच्या त्रिकुटावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. जेम्स नीशामच्या समावेशामुळे मुंबईला फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. जसप्रीत बुमरा (१९ बळी), ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर-नाइल या वेगवान त्रिकुटाकडून मुंबईला पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी मागील सामन्यात बेंगळूरुला नमवल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. त्यामुळे स्पर्धेची विजयी सांगता करतानाच मुंबईचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचे केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादचे ध्येय असेल.