गत उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी आयपीएल २०२१च्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. विक्रमी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर काही विशेष करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकात ८ बाद १२९ धावा करू शकला. यानंतर, दिल्लीच्या विकेट्स देखील नियमित अंतराने पडत राहिल्या परंतु माजी कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ३३) एका टोकावर राहिला आणि संघाला विजय देऊनच परतला. रविचंद्रन अश्विनने (नाबाद २०) विजयी षटकार मारल्यावर दिल्लीने १९.१ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
आता मुंबईचे काय होणार?
यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी चांगली झालेली नाही. मधल्या फळीतील स्टार फलंदाज सातत्याने अपयशी ठरले. त्यामुळे मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे मुंबईचे प्लेऑफचे गणित बिघडले आहे. आता मुंबईचे दोन सामने बाकी असून त्यांनी हे सामने जिंकावे लागतीलच, परंतू इतर कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्या कामगिरीवरही रोहितसेनेचे भवितव्य अवलंबून आहे.
आता मुंबईचे सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांविरुद्ध होणार आहेत. हे सामने अनुक्रमे ५ आणि ८ ऑक्टोबरला होणार आहेत. मुंबईने हे सामने जिंकले तर त्यांच्या नेट रनरेटवर प्लेऑफची शर्यतीचे गणित अवलंबून असेल. या दोन सामन्यांपैकी एक सामना मुंबईने जिंकला, तर कोलकाता आणि पंजाबच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. चौथ्या स्थानासाठी झुंजण्यासाठी इतर संघांचे नेट रनरेट मुंबईपेक्षा (-०.४५) कमी असेल, तर मुंबई स्पर्धेत टिकून राहील.
हेही वाचा – IPL 2021 : गौतम गंभीर पुन्हा होतोय ट्रोल; धोनीचं नाव न घेता केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य!
दिल्लीचे स्टार फलंदाज अपयशी
मुंबईच्या १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे ३ गडी केवळ ३० धावांवर माघारी परतले. सलामीवीर शिखर धवन धावबाद झाला, त्यानंतर पृथ्वी शॉला कृणाल पंड्याने पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला कुल्टर-नाईलने बोल्ड केले. यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला आणि संघाचा स्कोर ५७ धावांवर आणला. पंतने २२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. त्याला जयंत यादवने झेलबाद केले. अक्षर पटेल ट्रेंट बोल्टचा बळी ठरल्यावर दिल्लीचा निम्मा संघ ७७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बुमराहने शिमरॉन हेटमायरला बाद केले.