आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफचा गुंता एक एक करून सुटत आहे. चेन्नई आणि दिल्लीनंतर आता बंगळुरूने प्लेऑफमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र अजूनही चौथ्या स्थानावर कोणता संघ जाणार हे अजूनही निश्चित नाही. त्यामुळे कोलकाता, पंजाब, मुंबई आणि राजस्थान या संघात चुरस कायम आहे. आयपीएल साखळी फेरीतील अजून आठ सामने उरले आहेत. दिल्ली, चेन्नई, राजस्थान, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद प्रत्येकी दोन सामने, तर पंजाब, कोलकात्याचा एक सामना उरला आहे. त्यामुळे पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर असल्याचं दिसत आहे. मात्र असं असलं तरी चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच कायम आहे.
आयपीएल गुणतालिकेत चेन्नईचा संघ १८ गुण आणि चांगल्या धावगतीमुळे अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल दिल्ली आणि बंगळुरूचा संघ आहे. चौथ्या स्थानावर सध्यातरी कोलकात्याचा संघ आहे. मात्र हे स्थान आता जर तर वर अवलंबून आहे. कोलकात्याचा साखळी फेरीत शेवटचा सामना उरला आहे. हा सामना गमवल्यास इतर तीन संघांना संधी मिळणार आहे. कोलकाता १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान आणि मुंबईचे प्रत्येकी १० गुण असून दोन-दोन सामने उरले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या आशा कायम आहेत. तर पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न एक सामना जिंकत राजस्थान, कोलकाता आणि मुंबईच्या पराभवावर अवलंबून आहे.
मुंबईला प्लेऑफमध्ये अशी मिळेल संधी
- मुंबईचे दोन सामने उरले आहेत. राजस्थान आणि हैदराबादसोबत सामना आहे.
- मुंबईने राजस्थानला पराभूत केल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. एक स्पर्धक चौथ्या स्थानाच्या शर्यतीतून बाहेर जाईल. तरीही मुंबईला दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे.
- कोलकात्याचा शेवटचा सामना राजस्थानसोबत आहे. राजस्थानने कोलकात्याला पराभूत केल्यास मुंबईला संधी मिळेल. हा सामना कोलकात्याने जिंकल्यास धावगतीवर गणित अवलंबून असेल.
- पंजाबचा चेन्नईसोबत शेवटचा सामना आहे. हा सामना पंजाबने गमवल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. या समीकरणासाठी मुंबईला दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे.
हे सामने महत्वाचे
- राजस्थान विरुद्ध मुंबई (५ ऑक्टोबर)
- चेन्नई विरुद्ध पंजाब (७ ऑक्टोबर)
- कोलकाता विरुद्ध राजस्थान (७ ऑक्टोबर)
- हैदराबाद विरुद्ध मुंबई (८ ऑक्टोबर)
आयपीएल २०२१ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. चेन्नई, दिल्लीनंतर बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तिन्ही संघांनी प्रत्येकी १२ सामने खेळले असून साखळी सामन्यातील औपचारिक दोन सामने खेळायचे आहेत. असं असलं तरी चेन्नई आणि बंगळुरूचं दिल्लीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. तिन्ही संघांची टॉप २ मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. कारण टॉप २ मध्ये असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात.