इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामातील उर्वरित सामने पुढील महिन्यापासून यूएईमध्ये होणार आहेत. जगातील सर्व दिग्गज आणि युवा खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुप्रसिद्ध लीगमध्ये खेळायचे आहे. या स्पर्धेतील संघ पंजाब किंग्जला आयपीएलपूर्वी जबर धक्का बसला आहे. पण याची भरपाई म्हणून पंजाब संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपूर्वी संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केला आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियासाठी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसला झाय रिचर्डसनच्या जागी उर्वरित हंगामासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.

आयपीएलचा १४वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हळूहळू संघांनी स्पर्धेसाठी कार्यक्रमस्थळी पोहचण्यास सुरुवात केली आहे. या हंगामातील उर्वरित ३१ सामने १५ ऑक्टोबरपर्यंत यूएईमध्ये होणार आहेत. सर्व फ्रेंचायझी संघ त्यांच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या ऐवजी इतर खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यात गुंतले आहेत.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब किंग्ज संघाने मोसमातील उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज एलिसला करारबद्ध केले आहे. बांगलादेशविरुद्ध टी-२० पदार्पणात हॅट्ट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या १५ जणांच्या संघातही स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा – RJ मलिष्कानं नीरज चोप्राकडं मागितली ‘जादु-की-झप्पी’; गोल्डन बॉय म्हणतो, ‘‘तुला लांबूनच…”

रिचर्डसन आणि मेरिडिथ बाहेर

रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलच्या या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. रिचर्डसन आणि मेरिडिथ यांना पंजाब किंग्ज संघाने लिलावात उच्च बोली लावून सामील केले. रिचर्डसनला १४ कोटी देऊन, तर मेरिडिथला ८ कोटी देण्यात आले होते.

Story img Loader