करोनामुळे आयपीएल स्पर्धेवर भीतीचं सावट पसरलं आहे. त्यामुळे काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थानच्या संघाला बसला आहे. आतापर्यंत राजस्थानचे ४ परदेशी खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी गेले आहेत. त्यामुळे राजस्थानच्या संघात परदेशी खेळाडूंची उणीव भासत आहे. राजस्थानच्या संघात आता कोण येणार? याबाबत क्रीडाप्रेमींना उत्सुकता लागली आहे. त्यातच राजस्थानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिोत संघाचा क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारा ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कुमार संगकारा खेळणार का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. त्याचबरोबर काहींनी तर कुमार संगकाराला पुढच्या सामन्यात संधी द्या, अशी मागणीही केली आहे.
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नवा ऑफ स्पिनर सहभागी झाल्याची गंमत केली आहे. तसेच या गोलंदाजीची कुणाकडून प्रेरणा मिळाली असा प्रश्न विचारला आहे. तेव्हा नेटीझन्सनं मुथैया मुरलीधरनकडून प्रेरणा मिळाली असेल, अशी उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये दिली आहेत. कुमार संगकाराने राजस्थानचं ट्वीट रिट्वीट केलं आहे.
Who’s the inspiration behind those off-breaks, Sanga?#HallaBol | #IPL2021 | @KumarSanga2 pic.twitter.com/iBzrIoVA5N
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 27, 2021
आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थानमधून ४ परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यात जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियम लिविंगस्टोन आणि अँड्र्यु टाय यांचा समावेश आहे. जोफ्रा आर्चरनं स्पर्धा सुरु होण्यापूर्वी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेन स्टोक्सनं गंभीर दुखापतीमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लियम लिविंगस्टोन बायोबबलला कंटाळून घरी परतला. तर देशातील करोना स्थिती पाहता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यु टायनं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
अमित मिश्राकडून मैदानात चूक; पंचांनी गोलंदाजी रोखली!
राजस्थानने आयपीएल स्पर्धेत एकूण ५ सामने खेळले आहेत. त्यात दोन सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थाननं दिल्ली आणि कोलकाताला पराभूत केलं आहे. तर पंजाब, चेन्नई आणि बंगळुरुकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर आहे.