आयपीएल २०२१च्या ५१व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. नाणेफेक गमावलेल्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद ९० धावा केल्या. जेम्स नीशम, नॅथन कुल्टर नाईल आणि जसप्रीत बुमराह यांनी तिखट मारा केला. फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे राजस्थानने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

यंदाच्या आयपीएलमध्ये २० षटकात सर्वात नीचांकी धावसंख्येचा विक्रम राजस्थानच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्यांनी ९२ धावा केल्या होत्या.

राजस्थानचा डाव

मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईस यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. फिरकीपटू जयंत यादवने टाकलेल्या दुसऱ्या षटकात जयस्वाल-लुईसने १५ धावा वसूल केल्या. वेनवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने चौैथ्या षटकात मुंबईकर फलंदाज यशस्वीला यष्टीपाठी झेलबाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. यशस्वीने १२ धावा केल्या. त्यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राजस्थानचा दुसरा सलामीवीर लुईसही माघारी परतला. जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत पकडले. लुईसने ३ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने २ बाद ४१ धावा केल्या. पुढच्याच षटकात जेम्स नीशामने राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनला झेलबाद केले. नीशामने मुंबईला अजून एक यश मिळवून दिले. त्याने नवव्या षटकात पुन्हा गोलंदाजीला येत डावखुऱ्या शिवम दुबेचा त्रिफळा उडवला. पन्नास धावा पूर्ण होण्याच्या आत राजस्थानने आपले चार महत्त्वाचे फलंदाज गमावले. १०व्या षटकात राजस्थानने अर्धशतक फलकावर लावले. ५० धावांवर असतानाना राजस्थानने आपला पाचवा फलंदाज ग्लेन फिलिप्सच्या रुपात गमावला. कुल्टर नाईलने त्याचा सुंदर त्रिफळा उडवला. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी संघाला थोडा आधार दिला. पण, १५व्या षटकात नीशमने तेवतियाला बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला. नीशमने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले. पुढच्याच षटकात बुमराहने श्रेयस गोपालला खातेही खोलू दिले नाही. एका बाजूने किल्ला लढवत असलेला डेव्हिड मिलरही कुल्टर नाईलचा बळी ठरला. मिलरने १५ धावा केल्या. मुंबईने २० षटकात राजस्थानला ९ बाद ९० धावांवर रोखले. नीशमव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलने १४ धावांत ४, तर बुमराहने १४ धावांत २ बळी घेतले.

हेही वाचा – मोठी बातमी! धोनीसह इंग्लंड क्रिकेटला जबर धक्का; ‘स्टार’ खेळाडू IPLला मुकणारच, सोबतच…

आयपीएल २०२१मध्ये नीचांकी धावसंख्या

९०/९ राजस्थान वि. मुंबई, शारजाह

९२ बंगळुरू विरुद्ध कोलकाता, अबुधाबी

१०६/८ पंजाब विरुद्ध चेन्नई, मुंबई

१११ मुंबई विरुद्ध बंगळुरू , दुबई

११५/८ हैदराबाद विरुद्ध कोलकाता, दुबई

Story img Loader