पदार्पणवीर जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनची संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ७ गड्यांनी मात दिली. यंदाच्या लीगमधील हैदराबादचा हा दुसरा विजय आहे. दुबईच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार संजू सॅमसनच्या ८२ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादसाठी जेसन रॉयने पदार्पणात आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाला उत्तम सुरुवात मिळवून दिली. तो बाद झाल्यानंतर विल्यमसनने संयमी अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हैदराबादचा डाव
डेव्हिड वॉर्नरच्या बदली संधी मिळालेला जेसन रॉय आणि वृद्धिमान साहा या हैदराबादची सलामीवीरांनी दमदार सलामी देत पाचव्या षटकात अर्धशतकी भागीदारी केली. संजूने पॉवरप्लेचे शेवटचे षटक महिपाल लोमरोरला दिले, महिपालच्या षटकात साहा यष्टीचीत झाला. साहाने १८ धावा केल्या. साहा बाद झाल्यावर केन विल्यमसन मैदानात आला. जेसन रॉयने विल्यमसह अर्धशतकी भागीदारी रचली. ११व्या षटकात रॉयने राहुल तेवतिच्या षटकात चौकार खेचत आपले अर्धशतक फलकावर लावले. रॉयच्या फटकेबाजीमुळे हैदराबादला या षटकात २१ धावा जोडता आल्या. पुढच्याच षटकात चेतन साकारियाने रॉ़यला बाद केले. रॉयने ८ चौकार आणि एका षटकारासह ८० धावा केल्या. त्यानंतर हैदराबादला अजून एक धक्का लागला. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने नवा फलंदाज प्रियम गर्गला शून्यावर झेलबाद केले. मुस्तफिझूरने आपल्याच गोलंदाजीवर गर्गचा झेल घेतला. त्यानंतर केन विल्यमसनने मोर्चा सांभाळला. त्याने अभिषेक शर्मासोबत उपयुक्त भागीदारी रचली. १९व्या षटकात विल्यमसनने मुस्तफिझूरला चौकार खेचत संघाच्या विजयासोबत आपल्या अर्धशतकावर शिक्कामोर्तब केले. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी केली. अभिषेक २१ धावांवर नाबाद राहिला.
राजस्थानचा डाव
एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. मात्र लुईसला मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला स्वस्तात बाद केले. त्यानंतर यशस्वीकडून आक्रमक फटके पाहायला मिळाले. कप्तान संजू सॅमसनसह यशस्वीने पहिल्या पॉवरप्लेमध्ये संघासाठी १ बाद ४९ धावा केल्या. चांगली लय पकडलेल्या यशस्वीला संदीप शर्माने नवव्या षटकात क्लीन बोल्ड केले. यशस्वीने ५ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. त्यानंतर आलेला लियाम लिव्हिंगस्टोन राशिद खानचा बळी ठरला. ११ षटकात राजस्थानने ३ बाद ८१ धावांपर्यंत मजल मारली. १४व्या षटकात राजस्थानने शतकी धावसंख्या गाठली. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने सिद्धआर्थ कौलला चौकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. कौलच्या १६व्या षटकात संजूने २० धावा कुटल्या. शेवटच्या दोन षटकात हैदराबादने कमबॅक करत संजू-महिपालला जास्त धावा करु दिल्या नाहीत. शेवटच्या षटकात कौलच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. कौलने या षटकात चार धावा दिल्या.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, एविन लुईस, ख्रिस मारिस, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकारिया, रियान पराग, राहुल तेवतिया, यशस्वी जयस्वाल, जयदेव उनाडकट, महिपाल लोमरोर.
सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन (कप्तान), वृद्धीमान साहा, राशिद खान, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, जेसन रॉय.