आयपीएल २०२१ च्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुतून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेल चांगलेच फॉर्मात आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला आहे. तर हर्षल पटेल गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज तग धरत नाहीत. त्यांच्या फॉर्ममुळे बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह बंगळुरुचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर या दोघांना मानाच्या कॅप देण्यात आल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलला चांगल्या फलंदाजीसाठी ऑरेंज, तर हर्षल पटेलला चांगल्या गोलंदाजीसाठी पर्पल कॅप देण्यात आली आहे.

मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलनं २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केली होती. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तर त्याने चांगलीच फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. त्याने ४१ चेंडूत ५९ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याने गोलंदाजांना झोडपून काढलं. ४९ चेंडूत त्यांने ७८ धावांची खेळी केली. या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. या तिन्ही सामन्यातील ग्लेन मॅक्सवेलची एकूण धावसंख्या १७६ इतकी आहे. त्यामुळे फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेल आघाडीवर आहे. या कामगिरीसाठी त्याचा ऑरेंज कॅप देऊन सन्मान करण्यात आला.


‘ही ऑरेंज कॅप घालून बरेच दिवस झाले. आता पुन्हा ही कॅप घालण्याची संधी मिळते याचा आनंद वाटतो. माझी खेळी अशीच पुढे राहील.’, असं मॅक्सवेलनं ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर सांगितलं.

IPL 2021: विराटसेनेची विजयी हॅट्ट्रिक; कोलकात्याला ३८ धावांनी पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी

हर्षल पटेलनं मुंबई विरुद्धच्या सामन्यात ४ षटकं टाकली. त्यात २७ धावा देत त्याने ५ गडी बाद केले. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास कायम ठेवत ४ षटकं दिली. त्यात त्याने २५ धावा देत २ गडी बाद केले. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. ४ षटकात १७ धावा देत २ गडी बाद केले. या तिन्ही सामन्यात त्याने एकूण ९ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं.

कोलकात्यावरील विजयानंतर बंगळुरुचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने सलग तीन सामने जिंकले आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला, दूसऱ्या सामन्यात हैदराबाद, तर तिसऱ्या सामन्यात कोलकात्याला पराभूत केलं आहे. बंगळुरुचा पुढचा सामना राजस्थानसोबत २२ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Story img Loader