आयपीएल २०२१ स्पर्धेत बंगळुरूने दिल्लीला ७ गडी राखून नमवलं आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बंगळुरूने विजय मिळवला. दिल्लीनं बंगळुरूला विजयासाठी १६५ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बंगळुरूने ७ गडी राखून पूर्ण केलं.

बंगळुरूचा डाव

दिल्लीने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची अडखळत सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही मैदानात तग धरू शकला नाही. अवघ्या ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्स बाद झाला. त्यानंतर श्रीकर भारत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सावरला. चौथ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. श्रीकर भारतने अर्धशतक केलं. तर त्याला ग्लेन मॅक्सवेलची मोलाची साथ लाभली. श्रीकर भारत ने ५२ चेंडूत ७८ धावांची नाबाद खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.

दिल्लीचा डाव

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. मात्र ११ व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर शिखर धवन बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. शिखर धवन पाठोपाठ पृथ्वी शॉही बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर जॉर्ज गार्टननं त्याचा झेल घेतला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतही जास्त काळ तग धरू शकला नाही. ८ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. डॅन ख्रिश्चियनच्या गोलंदाजीवर श्रीकर भारतने त्याचा झेल घेतला. श्रेयस अय्यरही १८ चेंडूत १८ धावा करत तंबूत परतला. मोहम्मद सिराज गोलंदाजीवर दिल्लीची पाचवी विकेट पडली. शिम्रॉन हेटमायर २२ चेंडूत २९ धावा करून बाद झाला.

स्पर्धेतील प्लेऑफचं चित्र स्पष्ट झालं असून दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल टॉप २ मध्ये असलेल्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत जाण्याची दोनदा संधी मिळते. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन सामने खेळावे लागतात.

प्लेईंग इलेव्हन

दिल्ली- ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर. अश्विन, रिपल पटेल, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नोर्त्या

बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, एबी डिव्हिलियर्स, डॅनिअल ख्रिश्चियन, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जॉर्ज गार्टन