आयपीएलच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (दि.९) सुरूवात होणार आहे. पण, त्यापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला अजून एक मोठा धक्का बसलाय. संघाच्या आणखी एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याआधी सलामीवीर देवदत्त पडिकललाही करोनाची लागण झाली होती, पण त्याने आता करोनावर मात केल्याचं समजतंय.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ट्विटरद्वारे सॅम्सला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच, तो सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचंही सांगण्यात आलं. “बीसीसीआयच्या सर्व नियमांचं पालन केलं जात असून आरसीबीची मेडिकल टीम सॅम्सच्या संपर्कात आहे, व त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ३ एप्रिल रोजी पहिल्यांदा भारतात आल्यावर सॅम्सने चेन्नईतील हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यावेळी त्याचा करोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. पण ७ एप्रिल रोजी त्याचा करोना चाचणीचा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सॅम्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, पण त्याला करोनाची लक्षणं दिसत नाहीयेत. सध्या त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे”, अशी माहिती आरसीबीने दिली.

आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना करोनाची लागण झाल्याने सॅम्स सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. डॅनियल सॅम्स ऑस्ट्रेलियाकडून चार टी-20 सामन्यात खेळलाय. तर, गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, यंदाच्या लिलावात दिल्लीने त्याला मुक्त केले, त्यानंतर आरसीबीने सॅम्सला आपल्या ताफ्यात घेतलं.


दरम्यान, ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये मुंबई आणि बँगलोर (MI Vs RCB) यांच्यात होईल. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा मुंबईचं कर्णधारपद सांभाळेल, तर विराट कोहलीच्या खांद्यावर आरसीबीची जबाबदारी असेल.