आयपीएल २०२१ स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. आता टॉप २ मध्ये राहण्यासाठी तीन संघामध्ये चुरस आहे. कारण टॉप २ मधील संघाना अंतिम फेरीत जाण्याची दोनदा संधी मिळते. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात आज सामना सुरु आहे. या सामन्यात दोन यष्टीरक्षक कर्णधार आमनेसामने आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. त्यात आज दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याचा वाढदिवस असल्याने संघाचा कर्णधाराला विजयी गिफ्ट देण्याचा मानस आहे. सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसरीकडे धोनी आणि ऋषभ पंत यांच्यातील मैदानातील एका प्रसंगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
नाणेफेकीवेळी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात उतरले, तेव्हा एका धोनीच्या हातातील घड्याळाने ऋषभ पंत लक्ष वेधलं. तेव्हा क्षणाचाही विचार न करता महेंद्रसिंह धोनीचा हात हातात घेत त्याने घड्याळ निरखून पाहिलं. यावेळी महेंद्रसिंह धोनीने आपल्या हातातील घड्याळ ऋषभला दाखवलं. पंतने धोनीकडे बर्थडे गिफ्ट म्हणून घड्याळ मागितलं का, अशी चर्चाही फोटो पाहून चाहत्यांमध्ये रंगली.
दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऋषभ पंतला भारतीय संघाचा भावी कर्णधार असा उल्लेख करत युवराज सिंगने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ऋषभ पंतचा भावी कर्णधार असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर आयपीएल आणि टी २० विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच विराट कोहलीने टी २० विश्वचषकानंतर टी २० आणि आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युवराज सिंगच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.