मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पाच विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. दुखापतीमुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

रोहित शर्माला कोलकाता विरुद्ध एक हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. या सामन्यात रोहितने १८ धावा केल्यास त्याच्या कोलकाता विरुद्ध एक हजार धावा पूर्ण होणार आहेत. त्याच्या आता ९८२ धावा आहेत. रोहित शर्मा फॉर्मात असल्याने आज हा विक्रम तो त्याच्या नावावर करेल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर येण्याची शक्यताही आहे. आतापर्यंत त्याने एकूण ५,४८० धावा केल्या असून चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात १६ धावा केल्यास तो तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना सध्या तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ५,४९५ धावा आहेत.

रोहित शर्मा षटकारांचा विक्रमही प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. टी २० मध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आतापर्यंत त्याने एकूण ३९७ षटकार मारले आहेत. आजच्या सामन्यात ३ षटकार मारल्यास त्याच्या नावावर ४०० षटकार पूर्ण होणार आहे. दुसरीकडे पॉवरप्लेमध्ये ५० षटकार मारणारा मुंबई इंडियन्सचा पहिला फलंदाज ठरणार आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करता पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत ४८ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर कोलकाताविरुद्ध आयपीएलमध्ये १०० चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरू शकतो. त्याने कोलकाताविरुद्ध आतापर्यंत ९६ चौकार मारले आहेत. आजच्या सामन्यात चार चौकार मारल्यास त्याचे १०० चौकार होणार आहेत.

Story img Loader