२०११ पासून आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) आयपीएलमध्ये दरवर्षी सामाजिक संदेश देत आला आहे. फ्रेंचायझींनी त्यांचे खेळाडू हिरव्या जर्सीत मैदानावर उभे केले, पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवणे हे त्याचे उद्दिष्ट होते. पण यावेळी आरसीबी निळ्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरली. यूएईतील दुसऱ्या टप्प्यात आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने निळी जर्सी घालून एक संदेश दिला आहे.
ही निळी जर्सी करोना काळात योगदान देत असलेल्या व्यक्तींसाठी समर्पित आहे. गेल्या दीड वर्षांपासून थैमान घातलेल्या करोना महामारीमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, मीडिया हे सर्वजण काम करत होते. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. फ्रेंचायझीने आयपीएल २०२१च्या पूर्वाधातच निळी जर्सी घालण्याची घोषणा केली होती, पण नंतर अचानक ४ मे रोजी करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
“आम्ही चाहत्यांना दिलेले वचन पाळण्याचा आमचा हेतू आहे. आम्ही कोलकाताविरुद्धच्या फ्रंटलाइन वॉरियर्सला श्रद्धांजली देण्यासाठी निळी जर्सी परिधान करू. संघाने परिधान केलेल्या निळ्या जर्सीचा लिलाव केला जाईल. आणि मिळवलेला महसूल भारतात लसीकरणासाठी तैनात लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. गिव इंडिया आणि फॅन काइंड यांच्या सहकार्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे”, असे टीम मॅनेजमेंटशी संबंधित एका अधिकाऱ्याने सामन्यापूर्वी सांगितले होते.
हेही वाचा – RCB vs KKR : विराट कोहलीचं द्विशतक; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
आरसीबी सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना सात पैकी फक्त तीन सामने जिंकावे लागतील. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर आज विराटसेना दोन वेळा चॅम्पियन कोलकाताचा सामना करणार आहे. या हंगामानंतर विराट आरसीबीचे कप्तानपद सोडणार आहे.
हेड-टू-हेड आकडेवारी
या सामन्यापूर्वी आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ २८ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये १५ सामने केकेआरने जिंकले आहेत, तर १३ वेळा आरसीबीने विजय मिळवला आहे. यूएईमध्ये आरसीबी आणि केकेआर तीन वेळा भिडले आहेत. त्यापैकी एक सामना अबुधाबीमध्ये आणि दोन सामने शारजाहमध्ये खेळले गेले आहेत. येथे रेकॉर्ड २-१च्या फरकाने आरसीबीच्या बाजूने आहे. आरसीबीने येथे खेळलेले शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर केकेआरचा २०१४मध्ये सामना जिंकला होता.