आयपीएल २०२१चा ४९वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साऊदी, मावी यांच्या तिखट माऱ्यासमोर हैदराबादचा संघ २० षटकात ८ बाद ११५ धावा करू शकला. प्रत्युत्तरात कोलकाताची हे सोपे आव्हान गाठण्यात चांगलीच दमछाक झाली. पण सलामीवीर शुबमन गिलचे अर्धशतक आणि नितीश राणाची उपयुक्त खेळी कोलकाताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. शुबमनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या दृष्टीने मजबूत पाऊल टाकत गुणतालिकेत १२ गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. कोलकाताच्या विजयामुळे राजस्थान रॉयल्स , मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या संघांचे टेन्शन वाढले आहे. आता कोलकाता आणि पंजाबचा एकच सामना बाकी आहे, तर मुंबई आणि राजस्थान यांचे प्रत्येकी २ सामने खेळायचे बाकी आहेत.

कोलकाताचा डाव

हैदराबादच्या ११६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये त्यांनी फॉर्मात असलेल्या व्यंकटेश अय्यरला गमावले. वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने त्याला विल्यमसनकरवी झेलबाद केले. पॉवरप्लेमध्ये कोलकाताने १ बाद ३६ धावा केल्या. पुढच्याच षटकात राशिद खानने राहुल त्रिपाठीला तंबूचा मार्ग दाखवला. ११व्या षटकात सलामीवीर शुबमन गिलने राशिदला षटकार खेचत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर शुबमनने नितीश राणासोबत धावफलक हलता ठेवला. शुबमनने वैयक्तिक अर्धशतक आणि नितीशसोबत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर कोलकाताने आधी शुबमनला आणि नंतर नितीशला गमावले. शुबमनने १० चौकारांसह ५७ तर नितीशने २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि कप्तान इऑन मॉर्गनने २०व्या षटकात लक्ष्य पूर्ण केले.

हैदराबादचा डाव

कोलकात्याचा जलदगती गोलंदाज टिम साऊदीने पहिल्याच षटकात हैदराबादचा सलामीवीर फलंदाज वृद्धिमान साहाला पायचीत पकडले. साहाला भोपळाही फोडता आला नाही. पॉवरप्लेच्या चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने सलामीवीर जेसन रॉयला साऊदीकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. रॉयने १० धावा केल्या. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनने मोर्चा आपल्या हातात घेत ६ षटकात पंजाबला २ बाद ३५ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने मावीच्या या षटकात १८ धावा वसूल केल्या. मात्र पुढच्याच षटकात फिरकीपटू शाकिब अल हसनने चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विल्यमसनला धावबाद केले. विल्यमसनने २६ धावा केल्या. १०व्या षटकात हैदराबादने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्या षटकात शाकिबच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा यष्टीचीत झाला. त्यानंतर युवा फलंदाज प्रियम गर्गने थोडा प्रतिकार केला, पण १५व्या षटकात वरुण चक्रवर्तीने त्याला तंबूत धाडले. गर्गने २१ धावांचे योगदान दिले. वरच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर जेसन होल्डर आणि अब्दुल समदही धावा जमवण्यात अपयशी ठरले. शंभर धावांच्या आतच हैदराबादने आपले सात फलंदाज गमावले. १९व्या षटकात हैदराबादने शतक पूर्ण केले. २० षटकात हैदराबादने ८ बाद ११५ धावा फलकावर लावल्या. कोलकात्याकडून साऊदी, मावी आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा – RCB vs PBKS : केएल राहुलनं पंचांशी घातला वाद; ‘ती’ घटना पाहून नेटकरी म्हणाले, ‘‘पंचसुद्धा आर्यन खानबरोबर…”

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद – जेसन रॉय, वृद्धीमान साहा, केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि सिद्धार्थ कौल.

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, शाकिब अल हसन, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी.

Story img Loader