आयपीएल २०२१ च्या स्पर्धेला आता रंग चढू लागला आहे. दोन सामन्यांनंतर आता सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइटराइडर्स यांच्यात तिसरा सामना रंगणार आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोलकाता नाइटराइडर्सने दोन चषक आपल्या नावावर केले आहेत. २०१२ आणि २०१४ साली कोलकाताने अंतिम फेरीत विजय मिळवत चषकावर आपलं नाव कोरले होते. तर सनराईजर्स हैदराबादने २०१६ साली आयपीएल चषक आपल्या नावावर केला होता.

कोलकाता नाइटराइडर्स खास रणनितीसह मैदानात उतरणार आहे. मॉर्गनकडे पहिल्यांदाच कर्णधारपदाची पूर्ण जबाबदारी असणार आहे. मागच्या पर्वात कोलकाता नाइटराइडर्सने ६ सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी आघाडीला फंलदाजीसाठी मैदानात उतरतील. त्यानंतर नितीश राणा, दिनेश कार्तिक, मॉर्गन आणि शाकिब यांच्यावर मधल्या फळीच्या फलंदाजीची जबाबदारी असेल. तळाला रसेल आणि नरेन या दोघांकडे आक्रमकपणे खेळण्याची कला आहे. फलंदाजी पाहता सनराइजर्स हैदराबादसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. तर कृष्णासारखा वेगवान गोलंदाजामुळे संघाला बळकटी मिळणार आहे. तर पॅट कमिन्स आणि लॉकी फर्ग्युसन पर्याय ठरु शकतात. मागच्या पर्वात फर्ग्युसनने ५ सामन्यात ६ गडी बाद केले होते. तर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये २ गडी बाद करत विजय मिळवून दिला होता. असं असलं तरी कोलकात्याच्या फिरकीची बाजू कमकुवत आहे. हरभजन सिंग मागच्या पर्वात खेळला नसल्याने त्याच्या कामगिरीचं मुल्यांकन करणं कठीण आहे. तर कुलदीप सुद्धा आउट ऑफ फॉर्म आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची चांगलीच धुलाई झाली होती.

सनराइजर्स हैदराबादमध्ये भुवनेश्वर कुमार परतल्याने गोलंदाजीला धार मिळणार आहे. मागच्या पर्वात दुखापतीमुळे भुवनेश्वरला केवळ ४ सामने खेळता आले होते. फिरकीपटू राशिद खान याच्यामुळे हैदराबादला गोलंदाजीला बळ मिळणार आहे. संघात केन विलियम्सनला स्थान मिळणं कठीण दिसतंय. त्यामुळे वॉर्नर आणि बेअरस्टो आघाडीला फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे.

सनराईज हैदराबादने मागच्या पर्वात एकूण १४ सामने खेळले होते. त्यापैकी ७ सामन्यात विजय मिळाला होता. तर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कोलकाता नाइटराइडर्सनेही १४ सामने खेळले होते. त्यापैकी ७ सामन्यात विजय तर ७ सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती. आयपीएल २०२० गुणतालिकेत सनराइज हैदराबाद तिसऱ्या स्थानी, तर कोलकाता नाइटराइडर्स पाचव्या स्थानावर होता.

दोन्ही संघातील संभाव्य ११ खेळाडुंची नावं
कोलकाता नाइटराइडर्स: शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, अँड्र्यु रसेल, सुनिल नरेन किंवा शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, शिवम मावी किंवा हरभजन सिंग, प्रसिद्ध क्रिष्णा, वरुण चक्रवर्थी

सनराईजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग,वृद्धीमान साहा, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम

सामन्याचं ठिकाण- एमए चिदम्बरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई
सामन्याची वेळ- रविवार, संध्याकाळी ७.३० वाजता

Story img Loader