रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB)कर्णधार विराट कोहलीला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध (SRH)झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर कोहली रागात होता, व त्याने ड्रेसिंग रुमकडे परतताना जाहिरातीच्या फलकावर बॅट मारली, नंतर बॅटने खुर्ची उडवली होती. याची गंभीर दखल घेत मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलंच फटकारलं आहे.
IPL प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कोहलीला आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचं नुकसान करणं अशा बाबींचा समावेश होतो. त्यानंतर मॅच रेफ्री व्ही. नारायण कुट्टी यांनी आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराट कोहलीला चांगलंच फटकारलं. नंतर आयपीएलनेही एका निवेदनाद्वारे याबाबत “विराट कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्हा 2.2 चे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी सामन्याच्या रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे”, अशी माहिती दिली.
Think @imVkohli is a bit cross #IPL2021 pic.twitter.com/nzEtxry6ic
— simon hughes (@theanalyst) April 14, 2021
कालच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 29 चेडूंमध्ये 33 धावा केल्या. पण जेसन होल्डरने त्याला विजय शंकरकडे झेल द्यायला भाग पाडलं. नंतर मैदानाबाहेर जाताना कोहली रागात होता. त्याने डग आउटमध्ये ठेवलेल्या खुर्चीला बॅटने उडवण्याआधी एका जाहिरातीच्या फलकावरही बॅट मारली. बंगळुरूच्या संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला, पण कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.