आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा फक्त दोन धावांनी पराभव करत निसटता विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या ३२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. पंजाबच्या एडम मार्कराम आणि निकोलस पूरन यांना शेवटच्या षटकात ४ धावांची गरज होती, पण राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागीने एकच धाव देत आणि दोन विकेट्स घेत सामना आपल्या बाजूने फिरवला. दरम्यान पंजाब किंग्सच्या एका निर्णयामुळे सुनील गावसकरांना चकित केलं. समालोचन करताना त्यांनी यावरुन पंजाब किंग्सला चांगलंच फटकारलं.
राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यात खेळताना पंजाबने त्यांचा विस्फोटक फलंदाज ख्रिल गेलला विश्रांती दिली. पंजाबने एडन मार्कराम, निकोलस पूरन, आदिल रशीद, फॅबियन एलन या चार विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याचा निर्णय़ घेतला होता. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना कर्णधार के एल राहुलने गेलच्या जाही एडन मार्कराम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल असं सांगितलं.
RR vs PBKS : रंगतदार सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, शेवटच्या षटकात फिरला सामना
क्रिस गेलने आठ सामन्यांमध्ये १७८ धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतल्याने इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसन आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे मंगळवारी क्रिस गेलचा वाढदिवस होता.
“मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त क्रिस गेल नाराज असेल. आपण याबद्दल बोलू शकतो. यासंबंधी नक्कीच प्रश्न विचारले जातील. क्रिस गेलला त्याच्या वाढदिवशी न खेळवण्याच्या निर्णयाबद्दल मला समजलं नाही. तो किती उत्साही आहे याबद्दल मी सांगितलं. जर त्याला एखाद्या सामन्यात खेळवायचं होतं तर तो आजचा सामना होता. मला यामागे काय विचार आहे कळलं नाही,” असं पीटरसनने म्हटलं.
सुनील गावसकरांनीदेखील यावर आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं की, “मलादेखील पीटरसनप्रमाणे आश्चर्य वाटत आहे. इतर खेळाडू चांगली खेळी करुन सामना जिंकवून देऊ शकतात. मात्र वाढदिवशी तुम्ही तुमच्या सर्वोत्तम खेळाडूला खेळवत नाही हे आश्चर्यकारक आहे. फक्त आयपीएलच नाही तर सीपीएल, बिग बॅश …तुम्ही नाव घ्याल तिथे त्याने जबरदस्त खेळी केली आहे. आणि तुम्ही त्याच्या वाढदिवशी त्याला खेळवत नाही, हे तर्कशून्य आहे”.
राजस्थान रॉयल्सने जिंकला सामना
नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३२ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १२० धावांची दमदार सलामी दिली. मयंकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला २० षटकात १८२ धावाच करता आल्या. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.
शेवटच्या षटकात फिरला सामना
शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी ४ धावांची गरज असताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर पूरन वैयक्तिक ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर त्यागीने एक चेंडू निर्धाव टाकला. पुढच्या चेंडूवर त्याने दीपक हुडाला यष्टीपाठी झेलबाद केले. एका चेंडूत तीन धावांची गरज असताना त्यागीने फॅबियन एलनला धाव घेऊ दिली नाही आणि राजस्थानने आपला विजय साजरा केला. दुसऱ्या बाजूला असलेला मार्कराम २६ धावांवर नाबाद राहिला.