आयपीएलमध्ये संजू सॅमसनची साजेशी खेळी होत नाही. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसननं शतक केलं. मात्र त्यानंतरच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली ना्ही. त्याची कामगिरी पाहता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्याला शॉट्स सिलेक्शनवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. करिअर पुढे न्यायचं असल्यास त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. संजू सॅमसननं २०१५ मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. मात्र त्याने आतापर्यंत एक वनडे आणि १० टी २० सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. पण सुरुवातीपासून आक्रमक खेळी करण्यावर अंकुश लावणं गरजेचं आहे, असं मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

“खराब शॉट्स सिलेक्शनमुळे त्याची कामगिरी निराशाजनक होत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात तर तो ओपनिंग करत नाही. तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. तो पहिला चेंडू मैदानाबाहेर मारण्याचा प्रयत्न करतो. हे अशक्य आहे, भले तुम्ही फॉर्मात असाल. आपल्याला पहिल्या दोन किंवा तीन धावांसाठी खेळणं गरजेचं आहे. पायांची हालचाल करत खेळणं गरजेचं आहे.”, असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

“सॅमसनला स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. शॉट्स सिलेक्शनवर लक्ष केंद्रीत करून तो आपला स्वभाव बदलू शकतो. असं झाल्यास तो एक क्लास फलंदाज होईल, यात शंका नाही. जर त्याने तसं केलं नाही, तर देवानं दिलेलं टॅलेंट वाया जाईल.”, असं सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला २ धावांनी पराभूत केलं. या सामन्यात संजू सॅमसन ५ चेंडू खेळला आणि ४ धावा करून तंबूत परतला. तसेच राजस्थानला विजयासाठी १८५ धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानच्या कार्तिक त्यागीनं चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबच्या तोंडातून विजय हिरावून नेला.

Story img Loader