आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सहज विजय नोंदवला. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला वगळून हैदराबादने जेसन रॉयला संधी दिली. रॉयनेही तुफानी अंदाजात अर्धशतक ठोकत आपले पदार्पण साजरे केले. दुसरीकडे चाहते वॉर्नरच्या एक झलकची प्रतीक्षा करत होते. पण सामन्यापूर्वीही तो मैदानावर कुठे दिसला नाही. ऑरेंज आर्मीत वॉर्नरने आपला शेवटचा सामना खेळला आहे, असे मतही दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केले. आता सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी वॉर्नरच्या अनुपस्थितीवर भाष्य केले आहे.
पत्रकार परिषदेत बेलिस म्हणाले, ”आमच्या संघात बरेच युवा खेळाडू आहेत आणि या सामन्यापूर्वी आम्ही ठरवले, की आम्ही संघात काही बदल करणार आहोत. युवा खेळाडूंना स्टेडियमचा अनुभव मिळण्यासाठी डेव्हिड वॉर्नरने हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.”
ते पुढे म्हणाले, ”आमच्याकडे बरेच खेळाडू आहेत, जे हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांना मैदानावर राहण्याचा अनुभवही नव्हता. त्यामुळे आम्हाला त्या सर्व तरुणांना जास्तीत जास्त अनुभव द्यायचा आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव आणि शाहबाज नदीम हे खेळाडू मैदानावर आले नाहीत.”
हेही वाचा – ‘‘मी फक्त १० लाखांसाठी असं का करू?, पार्टी करायचो तेव्हा…”, स्पॉट फिक्सिंगबाबत श्रीशांतचा मोठा खुलासा!
एका प्रेक्षकाने इंस्टाग्रामवर डेव्हिड वॉर्नरवर टिप्पणी केली, ”मी रडणार आहे पण तुम्ही थोडी विश्रांती घ्या आणि नंतर जबरदस्त पुनरागमन करा.” हा पाठिंबा पाहून डेव्हिड वॉर्नरने उत्तरात लिहिले, ”दुर्दैवाने हे पुन्हा होणार नाही पण तुम्ही समर्थन करत रहा.” खराब फॉर्ममुळे आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात डेव्हिड वॉर्नरला संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. पण दुसऱ्या टप्प्यातही त्याला संधी मिळाली, मात्र तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि संघाने त्याला वगळण्याचा निर्णय घेतला.