भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच IPL गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता तब्बल ८ वर्षांनंतर एका क्रिकेटपटूने लिलावात आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.
Video: बुमराहचा सुसाट यॉर्कर इंग्लंडच्या फलंदाजाच्या पायावर लागला अन्…
IPL 2021च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावासाठी भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत यानेही आपलं नाव नोंदवलं असल्याचं वृत्त इएसपीएनक्रिकइन्फोने दिली आहे. या लिलावासाठी १ हजारांहून अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. त्यात श्रीसंतचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. नियमानुसार, १,०९७ खेळाडूंच्या नोंदणीची यादी प्रत्येक संघाला दिली जाईल आणि त्यातून एखाद्या संघाने श्रीसंतला विकत घेण्यात रस दाखवला तरच त्याला अंतिम लिलावात संधी मिळेल. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार केवळ एका दिवसाच्या असलेल्या या लिलावप्रक्रियेत केवळ ५०-६० खेळाडूंचीच नावं अंतिम यादीत येणार आहेत.
ख्रिस गेल अन् रिहानाचा जुना Video झाला व्हायरल
श्रीसंत IPL मध्ये २०१३ साली खेळला होता. त्यानंतर स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात त्याच्यावर आजीवन क्रिकेटबंदी घालण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे ती बंदी ७ वर्षांपर्यंत कमी करण्यात आली. त्यानंतर अखेर २०२०मध्ये त्याला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची संधी मिळाली. श्रीसंतने ४४ IPL सामन्यात ४० बळी घेतले. राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची तस्कर्स केरला या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं.