बंगळुरुच्या विराटसेनेनं कोलकाता नाइटराइडर्सला पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह विराटसेना आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुने २०४ धावांचा डोंगर रचला आणि विजयसाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र ही धावसंख्या करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले आणि ८ गडी गमवून १६६ धावा करता आल्या.

नाणेफेक जिंकून बंगळुरुने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला दोन गडी झटपट बाद झाल्याने संघावर दडपण वाढलं होतं. विराट कोहली आणि रजत पाटिदार हे दोघं वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झटपट बाद झाले. विराट ५ धावा तर रजत केवळ १ धाव करून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाची बाजू सावरली आणि चांगली भागिदारी केली. देवदत्त प्रसिधच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात राहुल त्रिपाठीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत कोलकात्याच्या गोलंदाजांना घाम फोडला. ग्लेन मॅक्सवेलनं ४९ चेंडूत ७८ धावांची आक्रमक खेळी केली. त्यात ३ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हरभजनच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स वादळ मैदानात आलं. त्याने कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. डिव्हिलियर्सने ३६ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केली. त्यात ३ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे.

RCB vs KKR : राहुल त्रिपाठीने घेतला विराट कोहलीचा शानदार झेल…पाहा VIDEO

बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच कोलकात्याच्या फलंदाजांवर दडपण होतं. आघाडीचे फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना झटपट बाद झाले. फलंदाजीसाठी आघाडीला आलेला शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ धावा, नितीश राणा ११ चेंडूत १८ धावा, तर दिनेश कार्तिक केवळ २ धावा करुन तंबूत परतला. शुबमनने आक्रमक खेळी करत २ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र जेमिसनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. कर्णधार ईऑन मॉर्गनही २३ चेंडूत २९ धावा करुन तंबूत परतला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना थेट कोहलीच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्यानंतर आंद्रे रसेलनं आक्रमक फलंदाजी करत संघाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मात्र हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या. बंगळुरुने कोलकात्याचा ३८ धावांनी पराभव केला.

‘‘…तर हा संघ जिंकण्यास पात्र नाही’’, संजय मांजरेकरांनी व्यक्त केला राग

कोलकात्यावरील विजयानंतर बंगळुरुचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने सलग तीन सामने जिंकले आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला, दूसऱ्या सामन्यात हैदराबाद, तर तिसऱ्या सामन्यात कोलकात्याला पराभूत केलं आहे. बंगळुरुचा पुढचा सामना राजस्थानसोबत २२ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Story img Loader