राजस्थान रॉयल्सचा १९ वर्षीय फलंदाज यशस्वी जयस्वालने शनिवारी अबुधाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या ५० धावा फक्त १९ चेंडूत पूर्ण केल्या. त्याने चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला षटकार ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीने हेझलवूडच्या या षटकात तीन षटकार आणि एक चौकार मारून २२ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडू म्हणून हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे, ज्याने १७ चेंडूत ही कामगिरी केली. केएल राहुलने आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक केले आहे. २०१८ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक केले.
या शानदार खेळीनंतर यशस्वीला त्याच्या बॅटवर महेंद्रसिंह धोनीचा ऑटोग्राफ मिळाला. मुंबईकर यशस्वीने सांगितले, ”माझ्या बॅटवर धोनीचा ऑटोग्राफ असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी प्रथम विकेटची चाचणी करण्याचा विचार करत होतो, पण आम्ही १९० धावांचा पाठलाग करत होतो, मला माहित होते की विकेट चांगली असावी. मी फक्त खराब चेंडूंचा फायदा उचलला, जेणेकरून आपण 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकू.”
हेही वाचा – IPL 2021: मुंबईला अडचणीत आणण्यासाठी चेन्नई मुद्दाम हारली का?; चाहत्यांना शंका
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शतकामुळे २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १७.३ षटकांत १९० धावा करून सामना जिंकला. राजस्थानसाठी यशस्वीने २१ चेंडूत ५० आणि शिवम दुबेने ४२ चेंडूत ६४ धावा केल्या. शिवमने या डावात ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले.