चेन्नईने हैदराबादवर ६ गडी आणि २ चेंडू राखून विजय मिळवला आहे. हैदराबादनं दिलेलं १३५ धावांचं आव्हान चेन्नईनं ४ गडी गमवून गाठलं. या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आणि प्लेऑफमधील स्थान निश्चित झालं आहे. तर हैदराबादचं प्लेऑफमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. विजयी षटकार ठोकत धोनीने विजय मिळवून दिल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. क्रिकेट विश्वात धोनीची बेस्ट फिनिशर म्हणून ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसात धोनीला सूर गवसत नव्हता. अखेर हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात षटकार ठोकत विजय मिळवून दिला. त्यामुळे ‘टायगर अभी जिंदा है’, ‘बंदे मे अभी दम है’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
चेन्नईचा डाव
ऋतुराज गायकवाड आणि फाफनं पहिल्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. त्यामुळे हैदराबादने दिलेलं लक्ष्य गाठणं सोपं झालं. मात्र ऋतुराजच्या गायकवाडच्या रुपाने चेन्नईला पहिला धक्का बसला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर केन विलियमसनने ऋतुराजचा झेल पकडला. ऋतुराजने ३८ चेंडूत ४५ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर राशीद खानच्या गोलंदाजीवर चेन्नईचा दुसरा गडी बाद झाला. मोइन अली त्रिफळाचीत झाला. मोइन अलीने १७ चेंडूत १७ धावा केल्या. सुरेश रैना पायचीत झाल्याने चेन्नईला तिसरा धक्का बसला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. ३ चेंडूत २ धावा करून बाद झाला. फाफ डुप्लेसिस ३६ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पाचव्या गड्यासाठी अंबाती रायडु आणि महेंद्रसिंह धोनी यांनी विजयी भागीदारी केली. ३ चेंडूत २ धावा हव्या असताना महेंद्रसिंह धोनी आपल्या नेहमीच्या फिनिशनर अंदाजात षटकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे.
हैदराबादचा डाव
हैदराबादला जेसन रॉयच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. ७ चेंडूत केवळ २ धावा करून जेसन रॉय तंबूत परतला आहे. जेस हेझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक धोनीने त्याचा झेल घेतला. जेसन रॉय तंबूत परतल्यानंतर केन विलियमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केन विलियमसनही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. केन विलियमसन ११ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राओच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. प्रियाम गर्गच्या माध्यमातून तिसरा धक्का बसला असून अवघ्या ७ धावा करून ब्राओच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाची विकेट मिळाली. वृद्धिमान साहा ४६ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने त्याचा झेल घेतला. अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या १०९ धावा असताना अभिषेक शर्मा बाद झाला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर फाफने त्याचा झेल घेतला. तो तंबूत जात नाही तोवर समादही बाद झाला. जोशच्या गोलंदाजीवर मोइन अलीने झेल घेतला. लागोपाठ दोन गडी बाद झाल्याने हैदराबादच्या धावसंख्येवर परिणाम झाला. त्यानंतर जेसन होल्डरही कमाल करू शकला नाही. ५ धावा करून शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
सनराइजर्स हैदराबाद संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नव्हता. तर चेन्नईने एक बदल करत ड्वेन ब्राओला संघात स्थान दिलं होतं.
प्लेईंग इलेव्हन
हैदराबाद- जेसन रॉय, वृद्धिमान साहा, केन विलियमसन, प्रियाग गार्ग, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समाद, राशीद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल
चेन्नई- ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, मोइन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एम एस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राओ, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर