भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची आयपीएल लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झाली आहे. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाखांमध्ये विकत घेतले. मुंबई इंडियन्स संघात निवड झाल्यानंतर अर्जुनने मोठी प्रतिक्रिया दिली.
मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लिलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त रक्कम देऊन विकत घेतले. लिलाव प्रक्रियेच्या शेवटी अर्जुन तेंडुलकरचे नाव यादीत आले. यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या बेस प्राईससाठी २० लाख रुपयांची बोली लावली. मुंबईने बोली लावल्यानंतर, गुजरात टायटन्सनेही स्वारस्य दाखवत बोली लावली. यानंतर मुंबईने पुन्हा बोली लावली आणि यावेळी गुजरातने अर्जुनला मुंबई इंडियन्सकडे जाऊ दिले. अशाप्रकारे सलग दुसऱ्या वर्षी अर्जुन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सने समावेश केला.
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणाला, ”मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन करताना मला खूप आनंद झाला आहे. मी लहानपणापासून या संघाचा मोठा चाहता आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी संघमालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानू इच्छितो. मी संघात सामील होण्यासाठी आणि माझे सर्वोत्तम देण्यासाठी तयार आहे.”
हेही वाचा – लिव्हिंगस्टोनची चौथ्या क्रमांकावर मुसंडी; पंजाब किंग्जची ११.५० कोटींची बोली
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरचाही त्यांच्या संघात समावेश केला. आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरचे नाव समोर आले तेव्हा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम बोली लावली आणि शेवटी मुंबईने ८ कोटींची बोली लावून आर्चरचा संघात समावेश केला.