सर्व फ्रेंचायझी आयपीएल २०२२ साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी अंतिम करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, २०२०च्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी पूर्ण केली आहे. यामध्ये गेल्या दोन मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनला दिल्ली संघ कायम ठेवणार नाही. धवन व्यतिरिक्त संघाने रवीचंद्रन अश्विन आणि कगिसो रबाडा यांनाही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि एनरिक नॉर्किया या खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, आगामी हंगामात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. संघाने श्रेयस अय्यर, अश्विन, शिखर धवन, कागिसो रबाडा यांना कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२० आणि २०२१ मध्ये धवन संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. असे असतानाही संघाने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, “शिखर आता ३६ च्या आसपास आहे. पुढील तीन हंगामांसाठी खेळाडूंना कायम ठेवले जात आहे आणि जे खेळाडू पुढील तीन वर्षांसाठी संघासाठी खेळू शकतील अशा खेळाडूंना फ्रेंचायझी कायम ठेवू इच्छिते. याशिवाय धवनचा स्ट्राईक रेटही चिंतेचा विषय ठरला आहे.
कायम ठेवलेले चारही खेळाडू शिखरच्या तुलनेत तरुण आहेत आणि पुढील तीन वर्षे तेच संघात योगदान देतील, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे. ऋषभ पंत २४, पृथ्वी शॉ २२, अक्षर पटेल २७ आणि एनरिक नॉर्किया २८ वर्षांचा आहे. धवन, अश्विन आणि कागिसो रबाडा आता आयपीएल २०२२च्या लिलावात उतरणार आहेत.