मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना कायम ठेवण्यात आले आहे. यामध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्या नावाचा समावेश नाही. पंड्या बंधू दीर्घकाळापासून या संघाचा भाग आहेत. हार्दिकने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. येथून त्याने आपले नाव कमावले आणि घातक अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. मुंबईतून बाहेर झाल्यानंतर हार्दिकने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने असे संकेत दिले आहेत, की तो कदाचित या संघात परत येणार नाही.
हार्दिकने २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये मुंबईसह आयपीएलचे विजेतेपद पटकावले. एक भावनिक व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला, “हे क्षण मी कायम माझ्याजवळ ठेवीन. मी इथे जी मैत्री केली आहे, जी नाती बांधली आहेत, लोक आहेत, चाहते आहेत, त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. मी केवळ एक खेळाडू म्हणून नाही तर माणूस म्हणूनही सुधारलो आहे. मी युवा क्रिकेटपटू म्हणून येथे मोठ्या स्वप्नांसह आलो. आम्ही एकत्र जिंकलो, आम्ही एकत्र हरलो, आम्ही एकत्र लढलो. या संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या हृदयात आहे. प्रत्येकजण म्हणतो की चांगल्या गोष्टींचा अंत व्हायला हवा, पण मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील.”
हेही वाचा – मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाच्या ‘त्या’ निर्णयामुळे रोहित शर्मा झाला नाराज; म्हणाला, “हे फारच…”
हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्म आणि दुखापतींमुळे त्रस्त आहे. त्याची गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. त्याने आयपीएलमध्येही गोलंदाजी केली नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकपपूर्वी त्याच्या गोलंदाजीची बरीच चर्चा झाली होती. वर्ल्डकपमध्ये त्याने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी केली असली, तरी त्याला विकेट घेता आली नाही. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सनेही त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.