आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसतील. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन संघांनी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर अधिकृतपणे लीगमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, बीसीसीआयने मंगळवारी मेगा लिलावाची तारीखही निश्चित केली आहे. हा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी असे दोन दिवस बंगळुरूमध्ये चालणार आहे. यापूर्वी, दोन्ही नवीन संघांना प्रत्येकी ३ खेळाडू निवडायचे असून त्यासाठी त्यांना २ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्याच वेळी, दोन्ही नवीन फ्रेंचायझींनाही लिलावापूर्वी संघाचे नाव घोषित करावे लागेल. लखनऊ फ्रेंचायझीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अलीकडेच, फ्रेंचायझीने गौतम गंभीरला आपला मेंटॉर बनवले आहे. तर अँडी फ्लॉवर संघाचे प्रशिक्षक आहेत.
गौतम गंभीरने सोशल मीडियावर लखनऊ संघाच्या नावाबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तेव्हापासून संघाच्या नव्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. इंस्टाग्रामवर गंभीरने आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लखनऊ संघाचे नाव शेअर केले आहे. पहिली दोन अक्षरे L आणि U स्पष्टपणे दिसतात. खालील दोन अक्षरे A आणि N आहेत.
हेही वाचा – IND vs SA: “आम्ही आणखी एक संधी देऊ…”; तिसऱ्या कसोटीतील रहाणेच्या खेळीनंतर भारतीय प्रशिक्षकांची भूमिका
अशा परिस्थितीत सोशल मीडिया यूजर्स दोन नावांचा अंदाज लावत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की लखनऊ फ्रेंचायझीचे नाव लखनऊ रेंजर्स किंवा पँथर्स असू शकते. गंभीरने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “श्श्श्श्श… नावाची घोषणा लवकरच केली जाईल. त्यासाठी अजून थोडा वेळ थांबा.”
बीसीसीआयने २५ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२२ साठी दोन नवीन संघांची घोषणा केली. लखनऊला RPSG व्हेंचर्स लिमिटेडने ७०९० कोटी आणि CVC कॅपिटलने अहमदाबाद संघाला ५६२५ कोटी रुपयांना विकत घेतले.