भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अजूनही आयपीएलमधील आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२२पूर्वी त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मिशीमध्ये दिसत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जला लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. चेन्नईचा संघ या स्पर्धेचा गतविजेता देखील आहे. यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी एकूण १० संघ उतरणार आहेत. २९ मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
आयपीएल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने टी-२० लीगच्या प्रोमोचा टीझर रिलीज केला आहे. यामध्ये धोनी ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे. पूर्ण प्रोमो काही दिवसांनी प्रदर्शित होईल. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त आयपीएल खेळतो. त्याला चेन्नईकडून खेळण्यासाठी १२ कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे, अष्टपैलू रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, करोनामुळे साखळी फेरीतील सर्व ७० सामने महाराष्ट्रातच होणार आहेत.
हेही वाचा – IND vs SL : ‘हा’ अफलातून कॅच पाहिला का? हवेत उडणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूला पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!
आयपीएलच्या १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ब गटात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.