भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटीनंतर तेथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. या दौऱ्यानंतर, जेव्हा सर्व अव्वल क्रिकेटपटू मायदेशी परततील, तेव्हा कदाचित भारतात करोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल. बीसीसीआयही या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत आयपीएल २०२२ साठी प्लॅन बी वरही काम सुरू आहे. यावेळी यूएईऐवजी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत आयोजित केली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे.
आयपीएल २०२२ म्हणजेच १५वा हंगाम अनेक अर्थांनी खास असणार आहे. संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. यावेळी मेगा लिलाव होणार असल्याने अनेक खेळाडू नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहेत. करोनामुळे देशातील परिस्थिती बिघडली आणि आयपीएल परदेशात हलवणे हाच एकमेव पर्याय वाटत असेल, तर भारतीय बोर्ड दक्षिण आफ्रिकेला पहिली पसंती देईल, या देशात २००९ मधील आयपीएल स्पर्धा खेळली गेली होती.
सध्या भारतात करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या अनेक स्पर्धा बीसीसीआयने एकापाठोपाठ एक पुढे ढकलल्या आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ”गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करावी लागली. यावेळी आम्हाला ही स्पर्धा आखाती देशातून बाहेर काढायची आहे. केवळ एका देशावर अवलंबून राहू शकत नाही. आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे.”
भारताचा टाइम झोन दक्षिण आफ्रिकेपेक्षा साडेतीन तास पुढे आहे. यूएई किंवा भारताप्रमाणेच, आयपीएलमधील रात्रीचे सामने लवकर सुरू करावे लागतात. जर प्रसारकांनी संध्याकाळी साडेसातच्या त्यांच्या पसंतीच्या वेळेला चिकटून राहिल्यास, दक्षिण आफ्रिकेत सामन्याचा पहिला चेंडू ४ वाजता टाकला जाईल. गेल्या काही वर्षांत, खेळाडूंनी अनेकदा मध्यरात्रीनंतर सामने संपत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.