जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कर्णधारपद का सोडले, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराटने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. तत्पूर्वी त्याने मागील वर्षी आरसीबीचा कॅप्टन म्हणून शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. नंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याने स्वत: दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडले.
विराट कोहली ‘द आरसीबी पॉडकास्ट’मध्ये म्हणाला, “मी अशा लोकांपैकी नाही, ज्यांना गोष्टी रोखून ठेवायच्या आहेत. पण जर मला या प्रक्रियेचा आनंद घेता येत नसेल, तर मी ते काम करणार नाही. जेव्हा एखादा खेळाडू असा निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या मनात काय होते हे समजणे लोकांना कठीण जाते. मला माझ्यासाठीही वेळ हवा होता आणि मला कामाचा भार संतुलित करायचा होता. बस.. मुद्दा इथेच संपतो.”
हेही वाचा – दारू, जुगार आणि तंबाखूचं सचिन तेंडुलकर करतोय समर्थन? वाचा काय म्हणाला क्रिकेटचा देव
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून आरसीबीने कधीही लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. फ्रेंचायझीचे कर्णधारपद सोडण्याबाबतच्या विविध चर्चांना पूर्णविराम देत कोहली म्हणाला, “वास्तवात असे काहीही नव्हते. मी माझे जीवन अतिशय साधेपणाने जगतो. जेव्हा मला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मी तसे करतो आणि नंतर जाहीर करतो. मला याबद्दल विचार करायचा नव्हता आणि आणखी एक वर्ष त्याबद्दल विचार करायचा नव्हता. माझ्यासाठी जीवनमान आणि क्रिकेटची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे.”