इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराचा जलवा पाहायला मिळत आहे. ससेक्ससाठी त्याने चार सामन्यांमध्ये तिसरे शतक झळकावले आहे. पुजाराने वूस्टरशायरविरुद्ध तिसरे शतक झळकावले. इंग्लंडमध्ये आल्यापासून पुजाराने ससेक्ससाठी आणखी एका काउंटी हंगामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डरहमविरुद्ध त्याने ११५ आणि ३५ धावा केल्या. यामुळे ससेक्सने दोन गडी राखून विजय मिळवला. यॉर्कशायरविरुद्ध स्वस्तात बाद झाल्यानंतर पुजाराने ग्लॉस्टरशायरविरुद्ध २३८ चेंडूंत २० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या.
शुक्रवारी ससेक्सचे कर्णधार असताना त्याने १८९ चेंडूत १३६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने १३८ चेंडूत शतक झळकावले. त्यात १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यादरम्यान पुजाराने स्टीव्ह स्मिथसोबत चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथने अॅशेसपूर्वी ससेक्ससोबत तीन सामन्यांचा करार केला आहे. अॅशेसची सुरुवात १६ जूनपासून एजबॅस्टन येथे होणार आहे.
तत्पूर्वी, ससेक्सकडून खेळणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ससेक्ससाठी पहिल्या डावात सात विकेट्स घेतल्या होत्या. पुजाराचे इंग्लंडमध्ये धावा करणे ही टीम इंडियासाठीही चांगली बातमी आहे, कारण भारताला तिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडिया सध्या दुखापतीशी झुंजत आहे. के.एल. राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे, तर जयदेव उनाडकटही दुखापतीने त्रस्त आहे.
राहुलच्या आधी ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहेत. पुजाराला लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अशा परिस्थितीत त्याने कौंटी चॅम्पियनशिप खेळण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या बाबतीतही असेच होते. त्याला कोणत्याही फ्रेंचायझीने आपल्या संघात स्थान दिले नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडन येथील ओव्हल येथे ७ जूनपासून खेळवला जाणार आहे.
हेही वाचा: IPL 2023: “मी त्या दोघांना…”, कोहली-गंभीर वादावर विराटने उचलले मोठे पाऊल, BCCIला केला मेल
१९००० धावा पूर्ण केल्या
शतकी खेळीदरम्यान पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९००० धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे. त्यांच्या आधी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वसीम जाफर यांनी हा पराक्रम केला होता. ससेक्ससाठी पुजाराची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या वर्षी पदार्पण केल्यापासून पुजाराने १९ डावांत ९७.६२च्या सरासरीने १५६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आठ शतके आणि तीन द्विशतके झळकावली आहेत.