सध्या टी-२० विश्वचषक २०२२ सुरु आहे, परंतु अशातच आत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचे वारे वाहू लागले आहे. बुधवारी (२ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीनंतर पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीग २०२३ हंगामासाठी मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवनची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, अलिकडच्या काळात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या धवनला पंजाब किंग्जचे नवीन मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची साथ मिळाली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये आयपीएल मेगा-लिलावापूर्वी मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना किंग्जने कायम ठेवले होते. आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी मयंकची केएल राहुलच्या जागी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्सने शिखर धवनला ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
आयपीएलच्या गेल्या काही हंगामात धवन सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने २०२० च्या मोसमात दिल्ली कॅपिटल्ससाठी ६१८ धावा केल्या होत्या. तसेच पंजाब किंग्ससाठी त्याच्या पदार्पणाच्या हंगामात १४ सामन्यात ४६० धावा केल्या. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांनी हंगाम संपल्यानंतर मयंकला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली होती. तसेच आता धवनची कर्णधारपदी नियुक्ती करावी, असे काहींचे मत होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मयंक अग्रवालची कामगिरी खराब राहिली –
पंजाब किंग्सने गेल्या मोसमात कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या बड्या खेळाडूंचाही आपल्या संघात समावेश केला होता. मात्र मयंकच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी संघाला संघर्ष करावा लागला. गेल्या मोसमात कर्णधार म्हणून मयंकने १२ डावात १२२.५० च्या खराब स्ट्राईक रेटने केवळ १९६ धावा केल्या, ज्यात अर्धशतकांचा समावेश होता.
हेही वाचा – ICC T20 World Cup : दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान सामना आज ; वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस!
अलीकडच्या काळात मयंक अग्रवालला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता आगामी आयपीएल २०२३ मिनी लिलावापूर्वी पंजाब किंग्ज आपला माजी कर्णधार कायम ठेवतो का? हे पाहणे मनोरंजक असेल. सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.