IPL 2024 Auction, Anil Kumble: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावाने नवे विक्रम रचले. ही क्रिकेट लीग जरी भारताची टी-२० लीग असली तरी येथे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा होता. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी लिलावाचे सर्व जुने रेकॉर्ड तोडले आणि त्यांचा आकडा २० कोटींच्या पुढे नेला. स्टार्कने २५ कोटी रुपयांच्या (२४.७५ कोटी) लिलावाचा टप्पा गाठला. मात्र, भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे यावर खूश नाही. तो म्हणाला की, “हा भारतीय खेळाडूंवर अन्याय आहे आणि तो मी स्वीकारु शकत नाही.”
अनिल कुंबळे आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावादरम्यान जिओ सिनेमा अॅपवर या आयपीएलमध्ये झालेला बदल आणि विकासावर चर्चा करत होता. तो म्हणाला की, “तुम्ही परदेशी खेळाडूंवर इतका पैसा खर्च करत आहात, तर काही रक्कम ही स्टार भारतीय खेळाडूंवर का खर्च करत नाही. एवढ्या कोटी रुपयांचा पाऊस भारतीय खेळाडूंवर का पडत नाही? त्यांच्याकडे कौशल्य नाही का? हा मूर्खपणा आहे.” असे प्रश्न त्याने विचारले.
कुंबळेने यामागील काही कारणे देखील सांगितली आहेत. तो म्हणाला, “एवढे पैसे भारतीय खेळाडूंवर न खर्च होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यांना त्यांच्या संबंधित फ्रँचायझींकडे कायम ठेवण्यात आले आहे.” अलीकडच्या काळात टी-२० फॉर्मच्या बाबतीत फारसा चांगला नसलेला स्टार्कसारखा खेळाडूवर एवढी मोठी बोली लागल्याने कुंबळेलाही आश्चर्य वाटले. असे असूनही तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
हेही वाचा: IPL 2024 Auction: “परदेशी खेळाडूंसाठी वेगळी पर्स…”, अनिल कुंबळेने सॅलरी कॅपबाबत केले मोठे विधान
५३ वर्षीय अनिल कुंबळे म्हणाला, “मी संघांच्या दृष्टिकोनातून खूप आनंदी आहे परंतु मला खरोखर वाटते की फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंवर काही मर्यादा किंवा ब्रेक लावणे आवश्यक आहे, जेणेकरुन ते त्यांच्यावर फक्त एक विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च करू शकतील. २० कोटींची किंमत म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. मला माहित आहे की हे सर्व महान खेळाडू आहेत पण मिचेल स्टार्कला सुमारे २५ कोटी रुपये दिले जात आहेत, हे खूप माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट आहे.”
तो पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराहही जगातील उत्तम गोलंदाज आहे ना? तो जगातील सर्व फॉर्मेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे. पण या लिलावात तो पैशांचा पाऊस अनुभवू शकत नाही कारण त्याला आधीपासून काही फ्रँचायझींनी करारात राखून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, स्टार्कसारखा खेळाडू, ज्याचा टी-२० फॉर्म फारसा चांगला नाही, तो कमालीची कमाई करत आहे. मी फक्त कल्पना करू शकतो की विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू हे पाहत असतील आणि हे आपल्याबरोबर काय होत आहे, याचा विचार करत असतील.”
केकेआरने लिलावात मिचेल स्टार्कला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवले. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सचा २०.५० कोटी रुपयांमध्ये समावेश केला आहे. हैदराबादचे मालक संजीव गोयंका म्हणाले, “मिनी लिलाव यासाठी प्रसिद्ध आहेत. जर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील आणि कोणतेही विशिष्ट लक्ष्य किंवा पुरवठा नसेल तर हे घडू शकते आणि ते आज घडले. हे अडथळे प्रत्येक लिलावात मोडत राहिले पाहिजेत. २५ कोटींचा विक्रम पुढच्या वेळी तुटणार की नाही कुणास ठाऊक?”