IPL 2024 Auction: इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव झाला. हा एक छोटा लिलाव होता आणि बहुतेक संघांकडे त्यांचे प्रमुख खेळाडू आधीच होते. अशा परिस्थितीत भारताचे मोठे खेळाडू या लिलावाचा भाग नव्हते. यामुळे परदेशी खेळाडूंचा संपूर्ण लिलावात बोलबाला होता. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आकर्षणाचे केंद्र होते. सर्वप्रथम, लिलावात २० कोटींचा टप्पा पार करणारा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५० कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.
आयपीएल २०२४च्या लिलावात तिसरा सर्वात महागडा खेळाडू डॅरिल मिचेल साठीही अनेक संघांनी बोली लावली. प्रथम, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जने न्यूझीलंडच्या या फलंदाजासाठी बोली लावली. जेव्हा पंजाब किंग्सने ११.७५ कोटी रुपयांची बोली लावली तेव्हा पंजाब किंग्सची सह-मालक प्रीती झिंटाला मिचेलला खरेदी करण्याचा विश्वास होता, परंतु त्याच वेळी चेन्नई सुपर किंग्ज मैदानात सामील झाले. हे पाहून प्रिती झिंटाला धक्काच बसला. अखेरीस सीएसकेने मिचेलला १४ कोटींना विकत घेतले.
हेही वाचा: IPL 2024 Auction: “सीएसकेच्या प्रत्येक बोलीमागे धोनीचे…”, चेन्नईच्या सीईओ यांनी केला मोठा खुलासा
सीएसके डॅरिल मिचेलच्या बोलीत सामील झाल्यावर प्रीती झिंटाने आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया दिली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिचे चाहते खूप एन्जॉय करत आहेत. पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याबद्दल डॅरिल मिचेलने उत्साह व्यक्त केला असून, तो कर्णधार एम.एस. धोनीकडून शिकण्यास उत्सुक आहे.
चेन्नई सुपर किंग्जने त्याला १४ कोटी रुपयांना विकत घेतले आणि या लिलावात तो तिसरा करोडपती बनला. चेन्नई संघाने एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला, ज्यामध्ये मिचेल म्हणाला “नमस्कार, चेन्नईच्या चाहत्यांनो, मी डॅरिल मिचेल आहे. सर्वप्रथम, मला चेन्नईचा भाग होण्यासाठी आणि पिवळी जर्सी घालण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. ही एक यशस्वी फ्रँचायझीं आहे. तिचा भाग होण्यासाठी खूप प्रतीक्षा केली. डेव्हॉन कॉनवेबरोबर खेळण्यास उत्सुक आहे. मिशेल सँटनर आणि रचिन रवींद्र सारखे सर्व किवी खेळाडू एम.एस धोनीकडून खूप शिकतात. स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी आणि सीएसके चेंजिंग रूम “क्युरियस” चा भाग बनण्याचा अनुभव मला घ्यायचा आहे.”
मिचेलने आयपीएलच्या १६व्या हंगामात भाग घेतला नव्हता. त्याचा शेवटचा हंगाम २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सबरोबर होता. या टी-२० स्पर्धेत त्याने फक्त दोन सामने खेळले आणि ३३ धावा केल्या होत्या. मात्र, आगामी मोसमात तो पिवळी जर्सी घालणार आहे. डॅरिल मिचेल हा २०२३ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज होता, त्याने १० सामन्यांमध्ये ६९.००च्या सरासरीने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ५५२ धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने किवी संघासाठी ५६ टी-२० सामन्यांमध्ये २४.८६च्या सरासरीने १,०६९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच अर्धशतके आणि आठ विकेट्सचा समावेश आहे. तो एक फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे.