Indian Primer League Auction 2024: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यावेळी लिलावात एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. पंतचे सहकारी खेळाडू लिलावाचा भाग आहेत आणि अनेक फ्रँचायझी त्यांच्यावर बोली लावत आहेत. यावेळी पंत स्वतः लिलावाच्या टेबलवर बसला आहे पण, पंतवर बोली लावली जाणार नाही. ऋषभ पंत स्वतः दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावाच्या टेबलावर बसून खेळाडूंवर बोली लावणार आहे. या भूमिकेत दिसणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू आहे. सहसा खेळाडू निवृत्तीनंतर या भूमिकेत दिसतात.
लिलावात सहभागी होण्यासाठी पंत दुबईतील कोका कोला अरेनालाही पोहोचला आहे
ऋषभ पंत २०२२ च्या अखेरीस एका रस्ता अपघातात बळी पडला होता. डिव्हायडरला धडकल्याने त्याची भरधाव कार जळून खाक झाली. मात्र, पंतचा जीव वाचला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून अपघातानंतर पंत याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो झपाट्याने बरा झाला असून तो मैदानात परतण्याच्या अगदी जवळ आहे.
सध्या ऋषभ पंत जिममध्ये घाम गाळत आहे आणि कठीण कसरती करून दीर्घकाळ विकेटकीपिंग आणि फलंदाजीसाठी स्वत:ला तंदुरुस्त करत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने त्याला नवी भूमिका दिली आहे. लिलावादरम्यान तो संघाच्या टेबलवर असेल आणि त्याच्या गरजेनुसार खेळाडू खरेदी करू शकेल. पंत स्वत: खेळाडूंवर बोली लावणार आहे आणि आयपीएल सामन्यांदरम्यान कर्णधार करताना त्याच खेळाडूंबरोबर मैदानावरही दिसणार आहे.
लिलावातील आपल्या नव्या भूमिकेबाबत ऋषभ पंत म्हणाला की, “लहानपणापासूनचे माझे स्वप्न होते की, जर आयपीएलमधील एखाद्या संघासाठी काही भूमिकेत योगदान दिले तर बरे होईल आणि आता हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझी इच्छा आज पूर्ण झाली.” आयपीएलमध्ये येण्याबाबत तो म्हणाला की, “ते पुनरागमन खूप अवघड होते. सुरुवातीला खूप वेदना सहन कराव्या लागल्या, पण हळूहळू गोष्टी सोप्या झाल्या आणि आता मी जोरदार पुनरागमन करण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे.”
आयपीएल २०२४साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात सर्व १० संघांची एकूण २६२.९५ कोटी रुपये होती आणि या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडू खरेदी करता आले. आतापर्यंत मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले.