IPL 2024 on Rishabh Pant: भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, आयपीएल लिलावापूर्वी त्याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेव्ह स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंतचे स्वागत करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याच्या संपूर्ण आयपीएल खेळण्याबद्दल शंका आहेत. त्याचे पुनरागमन कसे करायचे? यावर फ्रँचायझीने एक तोडगा काढला आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी त्याचा एक प्रभावशाली खेळाडू म्हणजेच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करण्याचा विचार करीत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी रेव्हस्पोर्टला सांगितले की, “आम्हाला ऋषभ पंतच्या पुनरागमनाची अपेक्षा असून ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा त्याच्यासारखा कर्णधार असणे हे संघाच्या हिताचे आहे.” सूत्रांनी पुष्टी केली आहे की फ्रँचायझी ऋषभ पंतबाबत घाई करू इच्छित नाही. दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतच्या रिकव्हरीसाठी पूर्ण प्रयत्न करू इच्छित आहे आणि बहुतेक सामन्यांमध्ये त्याचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर करण्याचा विचार करत आहे.
ऋषभ पंत सध्या यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास तयार नाही. तो यष्टिरक्षण करण्यास सक्षम आहे की नाही हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. या बातमीतून समोर येणारी मोठी अपडेट म्हणजे दिल्ली कॅपिटल्स पंतला प्रभावशाली खेळाडू म्हणून वापरण्याचा आग्रह धरणार आहे. यात ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऋषभ पंत २०२२ सालापासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही
२०२२ मध्ये, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला, ज्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. २०२२ मध्ये एका अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर मुंबईत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि गेल्या काही महिन्यांपासून तो पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. आता तो केव्हा पुनरागमन करू शकेल आणि पुनरागमन केल्यास तो पूर्ण तंदुरुस्त असेल की नाही हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.
ऋषभ पंतची कारकीर्द अशी आहे
जर ऋषभ पंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने ३३ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त ३० वन डे आणि ६६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ऋषभ पंतने आयपीएलमध्ये ९८ सामने खेळले आहेत. ऋषभ पंतने ३३ कसोटी सामन्यात ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत. तर ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ऋषभ पंतने ३४.६च्या सरासरीने ८६५ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ऋषभ पंतने भारतासाठी ६६ टी-२० सामन्यांमध्ये ३४.६१च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने कसोटी सामन्यात ५ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने वन डे फॉरमॅटमध्ये एकदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.