इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४ साठीचा लिलाव दुबईत पार पडला. या लिलावात एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंवर लिलावात पैशांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक कर्णधार पॅट कमिन्ससाठी सनराईजर्स हैदराबादनं २० कोटी ५० लाख रूपयांची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ही बोली ठरली.
हैदराबादचा हा विक्रम मोडत कोलकाता नाईट रायडर्सनं ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला २४ कोटी ७५ लाखांची बोली लावली. तर, ट्रॅविस हेडला हैदराबादनं आपल्या ताफ्यात घेतलं. त्यांनी हेडला ६ कोटी ८० लाख रूपयांत खरेदी केलं. यानंतर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कमिन्स आणि हेडचं अभिनंदन करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि एक्स ( ट्वीट ) अकाउंटवर पोस्ट करायला गेला. पण, सनराईज हैदराबादला टॅग करायला गेल्यावर वॉर्नरला ब्लॉक केल्याचं दिसलं. ही माहिती वॉर्नरनं इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली.
हेही वाचा : २४.७५ कोटी आणि २०.५० कोटी… मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या गगनभेदी मार्केट मूल्यांचे रहस्य काय?
हैदराबाद संघानं पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेडचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. ही स्टोरी हेडनं रिशेअर केली. तर, वॉर्नर हेडची इन्स्टा स्टोरी आपल्या अकाउंटवर शेअर करत होता. पण, हैदराबाद संघानं वॉर्नरला ब्लॉक केल्यानं ही स्टोरी शेअर करता आली नाही.
यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्यानं म्हटलं, “ज्या खेळाडूनं हैदराबाद संघाला चषक मिळवून दिला. तरीही त्याला अशी वागणूक देण्यात आली. हा सर्वात वाईट संघ आहे.”
तर, दुसरा एक चाहता म्हणाला, “ही हैदराबाद संघाची सर्वात वाईट वृत्ती आहे.”
दरम्यान, २०१४ साली हैदराबादनं वॉर्नरला लिलावात विकत घेतलं होतं. त्यानंतर २०१५ साली वॉर्नर हैदराबादचा कर्णधार झाला. २०१६ साली वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ‘आयपीएल’मध्ये चषक जिंकलं होतं. पण, चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आढळल्यानंतर हैदराबादनं वॉर्नरचं कर्णधारपद हिसकावून घेतलं होतं. तर, २०२२ च्या लिलावापूर्वी हैदराबादनं वॉर्नरला संघातून रिलीज केलं. सध्या वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघात खेळत आहे.