IPL 2024 Schedule Updates : आयपीएलचा आगामी १७वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होऊ शकतो. त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. महिला प्रीमियर लीग २२ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. डब्ल्यूपीएलचा अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाऊ शकतो. यानंतर पाच दिवसांनी आयपीएल सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २६ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेनंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे. २६ मे रोजी आयपीएलची फायनल झाली, तर टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहतील. कारण टी-२० विश्वचषकाला १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. तसेच ५ जून रोजी होणारा भारताचा पहिला सामना आणि आयपीएल फायनलमध्ये नऊ दिवसांचे अंतर असेल.

डब्ल्यूपीएल दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार –

बीसीसीआयने आपल्या संबंधितांशी याबाबत चर्चा केली आहे. महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. या वेळी दोन शहरांमध्ये हंगाम आयोजित केला जाईल. बंगळुरू आणि दिल्लीमध्ये होईल. गेल्या वेळी सर्व सामने मुंबईतील वेगवेगळ्या मैदानांवर झाले होते. एक-दोन दिवसांत महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असे मानले जात आहे.

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहली बाहेर

भारतीय खेळाडूंना मिळेल १० दिवसांचा ब्रेक –

जर आयपीएलच्या या तारखा अंतिम राहिल्या तर भारतीय खेळाडूंना इंग्लंड कसोटी मालिकेनंतर फक्त १० दिवसांचा ब्रेक मिळेल. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना २५ जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 likely to be played from march 22 to may 26 in india vbm