नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी इंग्लंडला परतला असून पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पंजाब किंग्ज संघाचे १२ सामन्यांत केवळ आठ गुण असून ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून ते बाद झाले आहेत. त्यामुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी परतल्याचा त्यांना फारसा फटका बसणार नाही.

जोस बटलर (राजस्थान रॉयल्स), विल जॅक्स आणि रीस टॉपली (दोघे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) हे इंग्लंडचे खेळाडूही मायदेशी परतले आहेत. त्यांच्या संघांचे ‘आयपीएल’मधील आव्हान शाबूत असल्याने त्यांची कमी या संघांना जाणवेल. इंग्लंडचा संघ २२ मेपासून पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे हे खेळाडू आता इंग्लंड संघात दाखल होतील.

हेही वाचा >>> फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नीरज, किशोर जेनाला थेट अंतिम फेरीत प्रवेश

अर्थातच, लिव्हिंगस्टोन आता पंजाब संघाच्या राजस्थान रॉयल्स (१५ मे) आणि सनरायजर्स हैदराबाद (१९ मे) या संघांविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. लिव्हिंगस्टोनची दुखापत गंभीर नसली, तरी पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वी त्याने आपल्या दुखापतीवर उपचार घ्यावे अशी इंग्लंडच्या व्यवस्थापनाची इच्छा आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघात निवड झालेले मोईन अली (चेन्नई सुपर किंग्ज), सॅम करन आणि जॉनी बेअरस्टो (दोघे पंजाब किंग्ज), फिल सॉल्ट (कोलकाता नाइट रायडर्स) हे खेळाडूही लवकरच ‘आयपीएल’ सोडून मायदेशी परतणार आहेत.

Story img Loader