पीटीआय, जयपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंदुरुस्ती प्राप्त करून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलवरच लखनऊ सुपर जायंट्स संघाची भिस्त असून आज, रविवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या ‘आयपीएल’ सामन्यात त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल.

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतीमुळे राहुलला अखेरच्या चार कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. त्यापूर्वी गेल्या ‘आयपीएल’मध्ये मांडीला झालेल्या दुखापतीमुळे तो चार महिने मैदानाबाहेर होता. मात्र, आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून लखनऊसाठी दर्जेदार कामगिरी करण्याचा त्याचा मानस असेल. ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या काही सामन्यांत राहुल केवळ फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. मात्र, यष्टिरक्षण केल्यास त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता वाढेल. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनही ट्वेन्टी-२० विश्वचषकाकरिता यष्टिरक्षक म्हणून प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे या दोघांच्याही कामगिरीवर भारताच्या निवड समितीचे लक्ष असेल.

हेही वाचा >>>मुंबई इंडियन्सच्या ‘हार्दिक’पर्वाला सुरुवात! सलामीच्या लढतीत आज गुजरात टायटन्सशी गाठ

राजस्थानचा संघ २०२२मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या हंगामातही राजस्थानने चांगली सुरुवात केली होती. मात्र, अखेर हा संघ पाचव्या स्थानी राहिला. राजस्थानची फलंदाजी मजबूत आहे. कर्णधार सॅमसनसह लयीत असलेला यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर या संघात आहेत. तसेच मधल्या फळीत ध्रुव जुरेल, शिम्रॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांसारखे तडाखेबंद फलंदाजही राजस्थानकडे आहेत.

दुसरीकडे, लखनऊ संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार राहुल, क्विंटन डीकॉक, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन यांच्यावर राहील. या फलंदाजांसमोर राजस्थानचे रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहल यांच्या फिरकीचे आव्हान असेल. लखनऊकडे रवी बिश्नोईच्या रूपात चांगला फिरकीपटू आहे. ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी करून विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

● वेळ : दुपारी ३.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 lucknow super giants vs rajasthan royals match sport news amy
Show comments