Rishabh Pant: आयपीएल २०२४ मध्ये सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर आहेत. आता ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेला अपघात आणि शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंतची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.पंत आपला फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने अद्याप ऋषभ पंतला फिट घोषित केलेले नाही. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे टेन्शन पुन्हा वाढू लागले आहे.
ऋषभ पंत भीषण कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानापासून बराच काळ दूर आहे.पंत एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेट खेळला नाही.त्यामुळे आता ऋषभ पंतला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. दुखापतीमुळे पंतला यापूर्वीच अनेक मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. पण आता आयपीएल २०२४ तो खेळणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
येत्य २२ मार्चपासून आयपीएल २०२४ चा १७वा हंगाम सुरू होत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स २३ मार्चपासून आयपीएल २०२४ च्या मोहीमेला सुरूवात करणार आहे. राष्ट्रीय अकादमीने त्याला फिट घोषित न केल्याने त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रांमध्येही सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे आता ऋषभ पंतबाबत दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऋषभ पंतला NCA कडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नाही, तर दिल्ली कॅपिटल्स BCCI ला पंतचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्याची विनंती करू शकते.
आयपीएल २०२४ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने १७व्या हंगामात ऋषभ पंत संघाचा कर्णधार असेल असे स्पष्ट केले आहे. पण पंत सामन्यांमध्ये केवळ फलंदाजीच करेल, विकेटकीपिंग करणार नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते.