Ajay Jadeja says Mumbai Indians should release Hardik Pandya : आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनबाबत बीसीसीआयच्या गव्हर्निंग काऊंसिलने नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यात आयपीएल फ्रँचायझींना आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी ६ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर माजी क्रिकेटर अजय जडेजाने मुंबई इंडियन्सला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. अजय जडेजा म्हणाला, मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पंड्याला आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी रिलीज करावे. मात्र, तो असेही म्हणाला की, रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबई संघ त्याला ‘राईट टू मॅच कार्ड’ वापरून पुन्हा घेऊ शकतो.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला रिलीज करावे –
कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने अडथळा आणला, तेव्हा जिओ सिनेमावप बोलताना अजय जडेजाने असे सुचवले की, ‘मुंबई इंडियन्सला थोडीशी जोखीम पत्करावी लागेल. कारण त्यांच्याकडे अनेक स्टार खेळाडू आहेत. जडेजाने सांगितले की, मुंबईने माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन करावे आणि हार्दिक पंड्याला रिलीज करावे, जेणेकरून त्याला लिलावात परत घेता येईल.’
मुंबई इंडियन्सने या तीन खेळाडूंना रिटेन करावे –
अजय जडेजा पुढे म्हणाला की, ‘रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू आहेत, ज्यांना मुंबई नक्कीच रिटेन करेल. कारण या खेळाडूंना जर रिलीज केले, तर त्यांना लिलावातूनविकत घेणे अशक्य आहे. तसेच, मला वाटते की मुंबई इंडियन्स त्यांचे ‘राईट टू मॅच कार्ड’ हार्दिक पंड्यासाठी वापरू शकतो. कारण रोहित, बुमराह आणि सूर्या हे असे खेळाडू आहेत, ज्यांना तुम्ही कदाचित लिलावातही खरेदी करू शकणार नाही. परंतु, तसेच या गोष्टीची पण शक्यता आहे की त्यांच्या दुखापतीमुळे इतर फ्रँचायझी त्यांच्यासाठी बोली लावून शकणार नाहीत.’
हेही वाचा – इरफान पठाणने IPL 2025 च्या ‘या’ नियमाबद्दल BCCI चे केले कौतुक; म्हणाला, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून…’
यावेळी आयपीएलमध्ये एक नवीन नियम आहे, ज्याच्या अंतर्गत आरटीएम कार्ड लागू झाल्यानंतर, इतर संघांना बोली लावण्याची आणखी एक संधी मिळेल. उदाहरणार्थ, जर हार्दिक पंड्या लिलावात असेल आणि पंजाब किंग्जने त्याच्यासाठी १२ कोटी रुपयांची बोली लावली, तर मुंबईला विचारले जाईल की त्यांना आरटीएम वापरायचे आहे का? त्यांनी तसे केल्यास पंजाबला बोली वाढवण्याची आणखी एक संधी दिली जाईल. जर पंजाबने ती वाढवून १४ कोटी रुपये केली तर पंड्याला परत मिळवण्यासाठी मुंबईला ती रक्कम द्यावी लागेल अन्यथा तो पंजाब संघात सामील होईल.