पीटीआय, चेन्नई
चेन्नई सुपर किंग्ज आपल्या प्रभावी फिरकी माऱ्याच्या मदतीने रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात मुंबई इंडियन्सला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करेल. मुंबईचा संघ या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराशिवाय मैदानात उतरेल. त्यामुळे एमए चिदम्बरम स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आव्हानाचा सामना करावा लागेल.
पाच जेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करेल. चेन्नईच्या संघाच्या महेंद्र सिंह धोनीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. बुमरा दुखापतीतून सावरत असल्याने तो मुंबईकडून सुरुवातीच्या टप्प्यात खेळणे सध्या तरी कठीण दिसत आहे. त्याची भरपाई करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनाकडे असेल. गेल्या वर्षी साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात षटकांच्या धिम्या गतीमुळे पंड्यावर एका सामन्याच्या प्रतिबंधाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. मुंबईकडे नेतृत्व करणारे अनेक खेळाडू आहेत. मात्र, पहिल्या सामन्यात भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणारा सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल.
तिलक, रिकेल्टनकडे लक्ष
गेल्या वर्षी मुंबई संघाचे नेतृत्व हे रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्या वेळी संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानी होता. या वेळी मुंबईचा संघ संतुलित दिसत आहे. मुंबईच्या वरच्या फळीत इशान किशनची भरपाई दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज रायन रिकेल्टन करेल. यानंतर सूर्यकुमार व तिलक वर्मा जबाबदारी पार पाडतील. रोहितच्या कामगिरीकडे या वेळी सर्वांचे विशेष लक्ष असेल. बुमराच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर आणि रीस टॉपली वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. तर, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा आणि मुजीब उर रहमान या फिरकीपटूंकडून संघाला अपेक्षा असतील.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.