चेन्नई : ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ शुक्रवारी समोरासमोर येणार आहेत. दोनही संघांचे आठ सामन्यांत केवळ चार गुण असून स्पर्धेतील आव्हान शाबूत राखायचे झाल्यास त्यांना उर्वरित सामन्यांत विजय मिळवणे जवळपास अनिवार्यच आहे.

चेन्नईचा संघ घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. यंदाचा हंगाम मात्र त्याला अपवाद ठरला आहे. त्यांना एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीचा अचूक अंदाज बांधता आलेला नाही. ‘आयपीएल’च्या इतिहासात प्रथमच त्यांच्यावर घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमविण्याची नामुष्की ओढवली.

दुसरीकडे, हैदराबादचा संघही कामगिरी उंचावण्यास उत्सुक असेल. हैदराबादला गेल्या दोनही सामन्यांत मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली. त्यांचाही विजयी पुनरागमनाचा मानस असेल.

आयुष म्हात्रेकडे लक्ष

गेल्या सामन्यात चेन्नईने १७ वर्षीय मुंबईकर फलंदाज आयुष म्हात्रेला ‘आयपीएल’ पदार्पणाची संधी दिली. त्याने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात १५ चेंडूंत ३२ धावा फटकावत सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.