विशाखापट्टणम : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ ‘आयपीएल’मध्ये आज, सोमवारी आमनेसामने येणार असून यावेळी दोन्ही संघांच्या नवनेतृत्वाचा कस लागेल. विशेषत: दिल्लीकर ऋषभ पंत आपल्या माजी संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

गेल्या हंगामानंतर दोन्ही संघात बरेच बदल झाले. संपूर्ण ‘आयपीएल’ कारकीर्दीत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला पंत आता लखनऊचे नेतृत्व करताना दिसेल. दुसरीकडे, गेल्या तीन हंगामांत लखनऊ संघाचे कर्णधारपद भूषविलेला केएल राहुल आता दिल्ली संघाचा भाग झाला आहे. मात्र, दिल्लीच्या संघाने राहुलपेक्षा अक्षर पटेलकडे नेतृत्वाची धुरा सोपविणे पसंत केले. काही महिन्यांपूर्वीच अक्षरची भारतीय ट्वेन्टी-२० संघाच्या उपकर्णधारपदीही निवड झाली आहे. त्यामुळे आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध करण्याचा अक्षरचा मानस असेल.

गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या खेळाडू लिलावात लखनऊ संघाने पंतवर तब्बल २७ कोटी रुपयांची विजयी बोली लावली. तो ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर निश्चितपणे दडपण असेल. दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त मिचेल स्टार्कवर असेल.

● वेळ : सायं. ७.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, जिओहॉटस्टार.